बिंदूनामावली तपासून घेण्यासाठी अंतिम नोटीस; शाळांची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभागाची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:46 PM2019-02-07T14:46:19+5:302019-02-07T14:49:21+5:30
सोलापूर : जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांनी बिंदूनामावली (रोस्टर ) तपासून घ्या अन्यथा शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशारा ...
सोलापूर : जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांनी बिंदूनामावली (रोस्टर ) तपासून घ्या अन्यथा शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस माध्यमिक विभागाने शाळांना दिली आहे.
राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये होणारी शिक्षकांची भरती शासनाने बंद ठेवली आहे. लवकरच ही भरती करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वी शाळांनी आपल्या शिक्षण संस्थेची बिंदूनामावली (रोस्टर) तपासून घेणे बंधनकारक आहे. याबाबत शिक्षण विभागाने अनेकवेळा शाळांना नोटीस बजावली, परंतु शिक्षकांची भरती होत नाही तर रोस्टर तपासून उपयोग काय असा सवाल शिक्षण क्षेत्रातून विचारला जात होता. आता लवकरच ही भरती होणार असल्याने शाळातील रिक्त पदे रोस्टर तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने अनुदानित माध्यमिक शाळांना रोस्टर तपासून घेण्याची तंबी दिली आहे.
बिगर अल्पसंख्याक अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या जागा तातडीने भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर लवकरच हाती घेतली जाणार आहे. शाळांनी पुणे येथील मागासवर्ग कक्ष, विधान भवन कार्यालयातून रोस्टर तपासून घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. सूचना देताना रोस्टर अपूर्ण ठेवणे ही बाब गंभीर असल्याचे अधोरेखित करताना अंतिम नोटीस देत असल्याचे नमूद केले आहे.
पोर्टलवर माहितीची सक्ती
बिंदूनामावली (रोस्टर)ची तपासणी मागासवर्ग कक्ष, पुणे येथून करावी आणि ही माहिती शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर भरावी़ ज्या शाळा अशी माहिती भरणार नाहीत त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा सक्त इशारा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील शाळांना दिला आहे.
शिक्षण संस्थांमध्ये बिंदू नामावली तपासून घेण्याबाबत उदासीनता आहे़ तपासणी करून मंजुरी घेतल्याशिवाय शिक्षक भरती करता येणार नाही़ शिक्षण संस्थांना ही संधी आहे़ गेले पाच दिवस पुण्यात हा कार्यक्रम सुरू आहे़ आज शेवटच्या दिवशी शाळांनी गर्दी केली आहे़ ७२ संस्थांनी तपासणीसाठी प्रस्ताव दिले आहेत़
- सूर्यकांत पाटील,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूऱ