घरी बसूनच होणार ऑनलाइन परीक्षा; अंतिम वर्षातील परीक्षांच्या या आहेत तारखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:56 PM2020-09-05T13:56:11+5:302020-09-05T13:59:44+5:30
दोन दिवसात वेळापत्रक होणार जाहीर; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून नियोजन
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वषार्तील विद्यार्थ्याच्या परीक्षा ५ ते २९ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले असून यासंदर्भात येत्या दोन दिवसात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक सीए श्रेणिक शहा यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोग, महामहिम राज्यपाल आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वषार्तील विद्यार्थ्याच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऑक्टोबररमध्ये परीक्षा होतील, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेचे स्वरूप हे घरी राहूनच आॅनलाईन पद्धतीने राहणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२० पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षा देता येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाइनची सुविधा उपलब्ध होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्येच आॅफलाईन परिक्षा देण्याची सुविधा राहणार आहे, परंतु त्याचे कारण विद्यार्थ्यांना गुगल फॉर्ममध्ये द्यावे लागणार आहे. अंतिम वषार्तील सर्व विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालये हा गुगल फॉर्म भरुन घेण्याची सोय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहेत.
५ ते २९ आॅक्टोबर २०२० या कालावधीत अंतिम वषार्तील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील, असे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आल्याचे सीए श्रेणिक शहा यांनी सांगितले. तर प्रॅक्टिकल परीक्षेसंदर्भात १५ सप्टेंबरपर्यंत सर्व माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्याचेही शहा यांनी सांगितले.