अखेर सोलापूर जिल्ह्यातील ७९ अतिरिक्त शिक्षकांचे झाले समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:15 PM2018-12-15T15:15:39+5:302018-12-15T15:16:59+5:30
सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गुरुवारी मार्गी लागला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ...
सोलापूर: गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गुरुवारी मार्गी लागला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत एकूण ७९ शिक्षकांना रिक्त पदांच्या जागेवर पदस्थापना देण्यात आली. यात पदसंख्या उपलब्ध नसल्यामुळे १७ जणांना पदस्थापना मिळू शकली नाही. त्यांना पुणे विभागाकडे पाठवण्यात येत असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यातील विविध खासगी शाळांमध्ये विविध कारणांनी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सामावून घेण्यासाठी गुरुवारी बैठक पार पडली. यासाठी मराठी, कन्नड, उर्दू माध्यमातील शिक्षक यावेळी उपस्थित होते. यामध्ये बिगर अल्पसंख्याक शिक्षकांची संख्या ५९ होती. यामधील २७ जणांचे ज्या खासगी शाळांमध्ये रिक्त जागा आहेत अशा ठिकाणी त्यांना समायोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३० जणांना संधी मिळाली. असे ५७ शिक्षक समायोजनासाठी पात्र ठरले. कन्नड माध्यमासाठी जागा रिक्त नसल्यामुळे दोन शिक्षकांचे समायोजन झाले नाही.
अल्पसंख्याक विभागातून ३७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यातील २२ जणांची खासगी शाळांमध्ये वर्णी लागली. १५ पुन्हा अतिरक्त ठरले. जिल्ह्यात जिल्हा परिषद अथवा खासगी शाळांमध्ये कन्नड शिक्षकांच्या जागा शिक्षक नसल्याने येथे १५ जण अतिरिक्त ठरले. बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक या दोन्ही विभागातून अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांना पुणे विभागाकडे पदस्थापनेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी राठोड यांनी स्पष्ट केले. सन २०१६-१७ आणि २०१७-१८ वर्षातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न जटिल बनला होता. वास्तविक २०१६-१७ च्या सेवक संचानुसार १३४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यातील ९७ जणांचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागला होता.
उर्वरित शिक्षक जाणार परजिल्ह्यात
- - गुरुवारी पार पडलेल्या बिगर अल्पसंख्याक शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमासाठी ४७ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली, कन्नड माध्यमात ५ आणि उर्दू शाळेमध्ये ७ अशा एकूण ५९ शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला. अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांना आता पुणे विभागाकडून जिथे रिक्त जागा असेल तेथे म्हणजे सोलापूर जिल्हा वगळता आंतरजिल्हा पदस्थापना घ्यावी लागणार आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित ठरलेला अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा प्रश्न आता निकाली लागला आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर पदस्थापना दिली आहे. पदसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांची यादी पुणे विभागाकडे पाठवण्यात येतील.
- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक