अखेर नऊ वर्षानंतर सांगोला कारखान्याचा वनवास संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:40+5:302021-09-13T04:21:40+5:30
सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना (वाकी-शिवणे, ता. सांगोला) हा कारखाना मागील अनेक वर्षांपासून कर्जाच्या आर्थिक विळख्यात सापडल्याने बंद होता. ...
सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना (वाकी-शिवणे, ता. सांगोला) हा कारखाना मागील अनेक वर्षांपासून कर्जाच्या आर्थिक विळख्यात सापडल्याने बंद होता. त्यामुळे सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. शेतकऱ्यांना शेजारच्या तालुक्यातील कारखान्यांना ऊस गाळपासाठी द्यावा लागत होता. या कारखान्याचे सुमारे १० हजार सभासद आहेत. दरम्यान राज्य शिखर बँकेकडून ५ ऑगस्ट रोजी सांगोला सहकारी साखर कारखाना लाँगलीग भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य शिखर बँकेचे चेअरमन अनास्कर, एमडी देशमुख, धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, सांगोला साखर कारखाना चेअरमन दीपक साळुंखे-पाटील यांची मुंबईत संयुक्त मिटिंग होऊन सांगोला कारखाना लॉंगलीग भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
.........
कारखाना मशिनरी दुरुस्तीला सुरुवात
धाराशिव साखर कारखान्याकडून वाकी-शिवणे येथील कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कारखान्यावर धाराशिव साखर कारखान्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कारखान्याची पाहणी केली तर रविवारी प्रत्यक्षात कारखान्याच्या स्वच्छता, साफसफाई, मशीनरी दुरुस्तीला सुरुवात केली आहे.
कोट ::::::::::::::
राज्य शिखर बँकेकडून नियम व अटीनुसार सर्व बाबींची पूर्तता करून घेतल्यानंतर सांगोला सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्यास बिग भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे. येत्या गळीत हंगामापासून कारखाना सुरळीत चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखान्याचे हित जोपासले जाईल.
- अभिजित पाटील
चेअरमन धाराशिव साखर कारखाना
कोट :::::::::::::::::
सांगोला साखर कारखाना बंद असल्याने तालुक्यातील हितशत्रू, संचालक मंडळाने कारखान्याच्या मशीनरी साहित्य विक्री केल्याचा आरोप करून बदनामी केली होती. मात्र धाराशिव साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कारखानास्थळी येऊन पाहणी केली. यानंतर सर्व मशीनरी साहित्य जागेवर असल्याने कारखाना चालवण्यास होकार दिला. डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील हा कारखाना चांगल्या प्रकारे चालवून शेतकरी सभासदांना न्याय देतील.
- दीपक साळुंखे-पाटील
चेअरमन, सांगोला साखर कारखाना
................
फोटो ओळ :
सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे छायाचित्र.