...अखेर कालव्याचे दार काढून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:36+5:302021-02-11T04:23:36+5:30
पंंढरपूर : नीरा उजवा कालवा फलटणअंतर्गत येणाऱ्या तिसंगी-सोनके तलावातून बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले. दरम्यान, त्याआधी पाटबंधारे ...
पंंढरपूर : नीरा उजवा कालवा फलटणअंतर्गत येणाऱ्या तिसंगी-सोनके तलावातून बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले. दरम्यान, त्याआधी पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागातील टीमने कालव्याचे नादुरूस्त झालेले दार काढण्यात यश मिळविले. यामुळे लाभक्षेत्रातील ९ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तिसंगी-सोनके तलाव लाभक्षेत्रातील गादेगाव, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, शेळवे, खेडभाळवणी आदी गावांना रबी व उन्हाळी हंगामात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रबी हंगामासाठी पाणी सोडत असताना तलावातील कालव्याचे दार नादुरुस्त झाल्याने पाणी सोडण्यास अडचणी येत होत्या. याबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता कार्यकारी अभियंता बोडखे, उपविभागीय अभियंता नागेंद्र ताठी, शाखा अभियंता अभिजित म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कालव्याचे दार काढण्यात यांत्रिकी टीमला यश आले. यामुळे लाभ क्षेत्रातील नऊ गावांतील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. शेतकऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाकडून काटेकोर नियोजन करून रबी व उन्हाळी हंगामात पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.