वित्तीय संस्थांनी कर्ज हप्ते भरण्यात सवलती देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:06+5:302021-04-12T04:20:06+5:30
करमाळा : लॉकडाऊनच्या कालावधीत बँका आणि फायनान्स कंपन्यांनी सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना कर्जाचा हफ्ता वसुलीसाठी तगादा ...
करमाळा : लॉकडाऊनच्या कालावधीत बँका आणि फायनान्स कंपन्यांनी सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना कर्जाचा हफ्ता वसुलीसाठी तगादा न लावता सवलत द्यावी, अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यामध्ये ४ एप्रिल २०२१ पासून कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्णयामुळे सामान्य व्यापारी आणि नागरिक अडचणीत सापडले आहेत. दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, वीज बिल, कर्जाचे हफ्ते, घराचा खर्च असे अनेक प्रश्न आहेत. सरकारी नोकरदारांना या काळातसुद्धा पगार सुरू असल्यामुळे या गोष्टीचा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. या काळात बँका आणि इतर वित्तीय संस्था कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावत आहेत. हप्ते न भरल्यास मनमानी पद्धतीने व्याज आणि लेट पेमेंट चार्जेस वसूल करत आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. राज्य शासनाने याचा विचार करून जोपर्यंत कडक निर्बंध शिथिल होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही बँक, फायनान्स, महावितरण यांनी वसुलीसाठी तगादा लावू नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर यासंदर्भात आदेश काढून व्यापारी वर्गाला आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जितेश कटारिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.