खंडित वीजपुरवठ्यांअभावी सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:48 PM2019-10-05T12:48:26+5:302019-10-05T12:49:38+5:30
पावसाळ्यातही त्रास; वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण
सोलापूर : सोलापुरी टेक्स्टाईल्स उत्पादनांना देशी बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने सध्या यंत्रमाग कारखानदार अडचणीत आहेत़ तयार मालाला बाजारात उठाव नसल्याने कारखानदारांची आर्थिक नाडी काहीशी मंद झाली आहे़ त्यामुळे त्यांनी उत्पादन प्रक्रियेला देखील ब्रेक दिला आहे़ पाच दिवसांचा आठवडा आणि रोजच्या वेळेत कपात केली असून उत्पादन निर्मिती तीस ते चाळीस टक्के घटवली आहे़ याचा सर्वाधिक फटका गरीब यंत्रमाग कामगारांना बसत आहे़ पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कामगारांचे उत्पन्न देखील घटले आहे़ त्यामुळे कामगारांचे आर्थिक नियोजन देखील कोलमडले आह़े़ अशात आता दसरा आणि दिवाळी सारखा मोठा उत्सव उंबरठ्यावर असल्याने कामगारांची चिंता वाढत चालली आहे.
बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस कामगारांना साप्ताहिक सुुुट्टी दिली जात आहे़ या डबल सुट्टीचा धसका कामगारांनी घेतला असून सुट्टीच्या दिवशी कामगार दुसºया ठिकाणी कामाला जात आहेत़ काही कारखान्यात दिवसाचे टायमिंग बदलले असून रोजच्या वेळेत कपात करण्यात आली आहे़ सध्या यंत्रमाग उद्योगात कामगार आणि मालकांना अच्छे दिवस नाहीत़ अनेकदृष्ट्या हा उद्योग अडचणीत सापडला आहे़ विशेष म्हणजे, निर्यात देखील पन्नास टक्क्यांहून अधिक घटल्याने कारखानदारांची आर्थिक उलाढाल खूप कमी झाली आहे़ काही कारखानदार या उद्योगातून बाहेर पडताहेत तर काही मालक पॉवरलुम्स भंगारात विकायला काढत आहेत.
कामगारांच्या विविध प्रश्नावर कामगार संघटना वारंवार रस्त्यावर उतरतात़ मालक संघटना आणि कामगार संघटना वर्षातून एक-दोनवेळा आमनेसामने येतात़ बोनस प्रश्न, पगारवाढीच्या प्रश्नावर मालक आणि कामगारांचे खटके उडतात़ याचाही परिणाम उद्योगावर होत आहे, असे मालक सांगतात़ मागच्या वर्षी कामगारांच्या पीएफ प्रश्नावर कामगार संघटनांनी संप पुकारला होता.
सोलापुरी चादर आणि टॉवेल्सला देशीबाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती़ आता पानीपत तसेच तामिळनाडू येथेही चादर आणि टॉवेल्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे़ त्यामुळे सोलापुरी मार्केटला देशी मार्केटमध्ये उठावच नाही़ तसेच आहे त्या मालाला कमी रेट येत असल्याने मालक उत्पादन विक्रीला पुढे येईनात़ माल स्टॉकचे प्रमाण प्रचंड वाढले आहे़ त्यामुळे नवीन उत्पादन घेण्याचे धाडस मालक करणार नाहीत़ दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चालल्याने उत्पादनाची किंमत देखील वाढत आहे़
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष,सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ
यंत्रमाग कामगार गरीब आहेत़ सहा दिवस काम केल्यानंतर त्यांना हजार ते पंधराशे रुपये मजुरी मिळते़ यात त्यांच्या परिवाराचे पालनपोषण होणे अशक्य आहे़ यातून मार्र्ग काढत कामगार संसाराचा गाडा हाकत असतात़ बाजारात मालाला उठाव नसल्याचे कारण सांगत बहुतांश कारखानदारांनी आता पाच दिवसांचा आठवडा केला़ यामुळे कामगारांची मजुरी आणखीन कमी झाली़ कामगारांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कटले आहे़ कामगार बेजार झाला आहे़ कामगारांचे भविष्यात कसे होणार, याची चिंता आम्हाला सतावत आहे़
- श्रीधर गुडेली, कार्याध्यक्ष, मनसे यंत्रमाग कामगार संघटना