विडी कामगारांची आर्थिक घडी विस्कटली; पूर्व भागाची अर्थव्यवस्था पार कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:06 AM2020-06-10T11:06:20+5:302020-06-10T11:07:54+5:30
सोलापुरातील विडी कारखाने सुरूकरण्याबाबत अद्याप पेच; महिला कामगार जाताहेत त्रासाला सामोरे
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : ज्या दोन उद्योगांवर पूर्व विभागाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ती अर्थव्यवस्था विडी कारखाने बंद असल्यामुळे पार कोलमडून गेली आहे. यंत्रमाग कारखान्याची धडधड थोडीफार ऐकावयास मिळत असताना मात्र विडी कारखाने सुरू करण्याबाबतचा प्रश्न काही सुटेना. विडी उद्योग जागीच थांबल्याने महिला कामगारांची आर्थिक घडीही विस्कटून गेली आहे. त्यामुळे महिला कामगारांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विडी उद्योग सुरू होईल, अशी अपेक्षा हजारो कामगारांना होती; पण प्रशासकीय नियमावलीत विडी उद्योगाला पूर्वपदावर येता येईना. रविवारी दिवसभर विडी उद्योजकांची बैठक सुरू होती. या बैठकीत महापालिका आयुक्तांकडून होणाºया कारवाईवर चर्चा झाली. प्रशासकीय नियमावलीनुसार कारखाने सुरू करता येईल का याचे चिंतनही झाले. पण प्रत्यक्षात ते शक्य नसल्याने कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय विडी उद्योग संघाने घेतला. त्यामुळे सोमवारी अर्थात ८ जूनपासून देखील कारखाने सुरू होणार नसल्याने विडी कामगारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. गेली अडीच महिने कामगार घरीच बसून आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ आहेत. कौटुंबिक अर्थव्यवस्था कोलमडल्याने त्यांची बेचैनी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पालिका आयुक्तांनी कारखाने कसे सुरू करता येईल? यावर चिंतन करणे गरजेचे आहे.
कारखानदार तसेच कामगार यांना विश्वासात घेऊन विडी उद्योग पूर्वपदावर आणणे अत्यंत निकडीचे बनले आहे; अन्यथा कामगार संघटनांच्या रूपात विडी कामगारांचा रोष रस्त्यावर येईल. त्यांच्या सहनशक्तीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे कारखानदार डोक्याला हात लावून बसले आहेत. कामगार संघटना मोठ्या आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास परिस्थिती चिघळेल. प्रशासन आणि कामगार संघटना आमने-सामने येतील. लोकांना आणखीन त्रास होईल. त्यामुळे प्रशासनाला एक पाऊल पुढे येऊन प्रॅक्टिकली गोष्टींचा विचार करून कारखाने सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
विडी कारखानदारांचा नवा पर्याय
- शहरातील कानाकोपºयात विडी कामगार विखुरले आहेत. पन्नास ते साठ हजार कामगारांच्या घरी जाणे कारखानदार आणि त्यांच्या नोकरांना शक्य नाही. त्यापेक्षा कारखानदार दुसरा पर्याय उपयुक्त असल्याचे सांगत आहेत. कारखानदारांनी मनपा आयुक्तांसमोर असा प्रस्ताव सादर केला आहे. विडी कारखान्यात येणाºया महिला कामगारांना ठराविक वेळ देऊ. सकाळी ९ ते १० या वेळेत फक्त तीस कामगारांना कारखान्यात प्रवेश देऊ. ३० कामगार पान-तंबाखू घेताना त्यांच्यात फिजिकल डिस्टन्स राहणार तशी व्यवस्था केली आहे. फिजिकल डिस्टन्सची चौकट कारखान्यात आखली आहे. कामगारांना मास्क बंधनकारक करू. कारखान्यातील कर्मचाºयांना हॅन्डग्लोज आणि मास्क बंधनकारक करू. कारखान्यात येणाºया प्रत्येक कामगाराची रोज थर्मल स्क्रीनद्वारे तपासणी करू. विडी कारखाने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. सदर ३0 कामगार पान-तंबाखू घेऊन बाहेर पडल्यानंतरच पुढच्या ठराविक वेळेत पुढच्या तीस लोकांना कारखान्यात प्रवेश देऊ. कामगार ठराविक वेळेतच कारखान्यात येतील. तशी नोंद त्यांच्या कार्डावर राहील. यामुळे कारखान्यात गर्दी होणार नाही. कामगार आणि कारखानदार यांच्यातील तणाव कमी राहील. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फार कमी आहे. कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न तत्काळ सुटेल.