वाळू लिलावासाठी ठेकेदार मिळेनात
By admin | Published: May 30, 2014 12:42 AM2014-05-30T00:42:56+5:302014-05-30T00:42:56+5:30
सोलापूर: वाळू साठ्याचे लिलाव घेण्यासाठी कोणीच ठेकेदार पुढे आला नसल्याने ४७ वाळू साठ्याचे लिलाव होऊ शकले नाहीत.
सोलापूर: वाळू साठ्याचे लिलाव घेण्यासाठी कोणीच ठेकेदार पुढे आला नसल्याने ४७ वाळू साठ्याचे लिलाव होऊ शकले नाहीत. साठ्याची किंमत २५ टक्के कमी करुन पुन्हा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, माण, भोगावती व नीरा नदीच्या पात्रातील वाळूचे लिलाव जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले होते. ४७ वाळू साठ्याच्या १२ लाख ३० हजार ब्रास वाळूची किंमत ८३ कोटी ४३ लाख ठरविण्यात आली होती. परंतु २१ मेपर्यंत ठेकेदार लिलाव घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे एकाही साठ्याचा लिलाव होऊ शकला नाही. साठ्याची किंमत २५ टक्क्यांनी कमी करुन लिलावाची प्रक्रिया राबविण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी आवश्यक असून परवानगीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाच नदीपात्रातील वाळूचे लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी राबविणार होते, परंतु लिलावाची प्रक्रियाच झाली नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ११, करमाळ्याचे १०, माढ्याचे ७, पंढरपूर तालुक्यातील ४, पंढरपूर-माळशिरसचे ४, मोहोळ व माळशिरसचे प्रत्येकी तीन, उत्तर सोलापुरातील एका साठ्याचा लिलाव होणार होता.
----------------------------
लिलाव होतीलच असे नाही वाळू साठ्याच्या लिलावासाठी आता फारच उशीर झाला आहे. नियमाप्रमाणे सप्टेंबरमध्ये वाळू उपसा बंद करावा लागणार आहे. आता लिलाव घेतला तर प्रशासन वाळूची उचल करण्यास परवानगी देण्यासाठी आणखीन काही दिवस लावणार आहे. याशिवाय भरलेली रक्कम कमी कालावधीत वसूल होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय चोरट्या वाहतुकीमुळे जागेवर वाळू शिल्लक असेलच असे नाही.