तिकीट न काढणाऱ्या एक हजार प्रवाशांकडून सव्वा सहा लाखाचा दंड वसूल; सोलापूर रेल्वेकडून कारवाई
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 28, 2023 05:17 PM2023-05-28T17:17:50+5:302023-05-28T17:19:57+5:30
२९ रेल्वे गाड्यांमध्ये ही कारवाई झाली आहे.
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर:सोलापूर रेल्वे विभागाने शनिवारी, विशेष मोहीम राबवून एक हजार प्रवाशांवर कारवाई केली आहे. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ही कारवाई झाली असून त्यांच्याकडून सहा लाख २१ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. २९ रेल्वे गाड्यांमध्ये ही कारवाई झाली आहे.
शनिवारी, २७ मे रोजी रेल्वेच्या विशेष पथकाने रेल्वे सुरक्षा बलाच्या साह्याने ही कारवाई केली आहे. ८६ तिकीट चेकर, चार वरिष्ठ अधिकारी, अठरा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आदींचा यात समावेश होता.
याचबरोबर मागच्या आठवड्यात रेल्वेकडून तिकीट चेकिंग मोहीम सुरू आहे. आठवडाभरात १ हजार ९९५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून १२ लाख २७ हजार २७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर रेल्वेची परवानगी न घेता रेल्वे स्टेशन परिसरात व्यवसाय करणाऱ्या १५ दुकानदारांवर देखील रेल्वेने कारवाई केली आहे. पंधरा दुकानदारांकडून ५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक लक्ष्मण रणयेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.