राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला आग; महापालिकेच्या जकातनाक्यावरील तीन ट्रक बिलं, रेकॉर्ड जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:20 PM2023-03-09T17:20:43+5:302023-03-09T17:22:53+5:30
१५ गाड्या पाणी मारून अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी लोकमत शी बोलताना दिली.
सोलापूर : शहरातील सात रस्ता परिसरातील राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला गुरूवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत महापालिकेच्या जकातनाक्यावरील तीन ट्रक बिलं, रेकॉर्ड जळून खाक झाले. १५ गाड्या पाणी मारून अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी लोकमत शी बोलताना दिली.
सात रस्ता परिसरात राजीव गांधी इनडोअर स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एक मोठे गोदाम आहे. या गोदामात महापालिकेच्या जकात नाक्यावरील जुनी बिलं, रेकॉर्ड पोत्यात बांधून ठेवले होते. मात्र गुरूवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या पथकाने १५ गाड्या पाणी मारून आग विझविली. या घटनेमुळे पहाटेच्या सुमारास या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. रेकॉर्ड जळत असताना जेसीबीच्या सहाय्याने फाईली खाली-वर करून पाणी मारून ही आग विझविली. यासाठी अग्निशामक दलाच्या पथकाने विशेष कामगिरी केली. या आगीच्या घटनेची माहिती समजताच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. शिवाय सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारीही यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याचे केदार आवटे यांनी सांगितले.