विजेची तार तुटल्याने घर आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:56 AM2019-05-28T11:56:59+5:302019-05-28T11:59:16+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील घटना; भर उन्हात कुटुंब झाले बेघर
सोलापूर : विजेची तार तुटून घरावर कोसळल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना सोमवारी दुपारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली. भर उन्हात बेघर होण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली.
कासेगाव येथील बाळासाहेब चौगुले यांच्या घरावरून महावितरणची मेन लाईन गेली आहे. दुपारच्या दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने या मेनलाईनची तार तुटली आणि ती बाळासाहेब चौगुले यांच्या घरावर पडली. पत्रे आणि छपराचे घर असल्यामुळे ठिणगी पडताच छपराने तातडीने पेट घेतला. आजूबाजूच्या लोकांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. काही मिनिटात घर होत्याचे नव्हते झाले.
घरातील अन्नधान्य, कपडेलत्ते, संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन लाखांची हानी झाली. मात्र कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. भर दुपारी ही घटना घडल्याने चौगुले कुटुंबीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. यापूर्वी तुकाराम जाधव यांच्या घरावरही विजेची तार तुटून पडली होती.
चौगुले यांच्या घराला आग लागताच अमोल जाधव, सोपान चव्हाण, आप्पा चौगुले,लखन वानकर, अनिल शिंदे, रणजित चौगुले, गोपाल चव्हाण, बालाजी जाधव घटनास्थळी धावून आले. त्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
या युवकांनी आपद्ग्रस्त चौगुले कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले आणि त्यांना मदत मिळवून दिली.
पाण्याचे दुर्भिक्ष
- घराला आग लागताच कासेगावचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. आग विझवण्यासाठी भांडी, घागरी घेऊन धावले, पण गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्यांचा नाईलाज झाला. अन्यथा ही आग विझवणे शक्य झाले नसते.