पहिला प्रयत्न फसला, दुसरी घटना घडविण्यासाठी दम दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:18+5:302021-07-20T04:17:18+5:30
मोहोळ : कट रचून शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांच्या अंगावर टेम्पो घालून खून करण्याचा कट आरोपी ...
मोहोळ : कट रचून शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांच्या अंगावर टेम्पो घालून खून करण्याचा कट आरोपी संतोष सुरवसे, रोहित फडतरे व पिंटू सुरवसे यांच्या सांगण्यावरूनच रचला होता. यासाठी बैठका झाल्या होत्या. १४ जुलैपूर्वी अर्थात आठ-दहा दिवसांपूर्वीच अंगावर टेम्पो घालून मारण्याचे ठरले होते. परंतु हा प्रयत्न फसला होता. म्हणून ही दुसरी घटना घडविण्यासाठी या तिघांनी मला दम दिला होता. त्यामुळे मी १४ जुलै रोजी या दोघांना जेवणासाठी बोलावून जाताना त्यांच्या अंगावर टेम्पो घातल्याचा कबुली जबाब टेम्पोचालक भैया असवले यांनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
नगरपरिषदेच्या राजकारणातून बोगस मतदार नोंदणी, रमाई घरकुल योजनेच्या गायब झालेल्या फायलींप्रकरणी शिवसैनिक सतीश नारायण क्षीरसागर व विजय सरवदे (रा. सिद्धार्थनगर, मोहोळ) यांनी तक्रारी करत आंदोलन केले होते. याचा रोष मनात धरून १४ जुलै रोजी या दोन शिवसैनिकांना एका हॉटेलवर जेवायला बोलावले होते. जेवण आटोपून मोटारसायकलवरून ते घराकडे जाताना पाठीमागून त्यांच्या अंगावर टेम्पो घालून खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे व टेम्पोचालक भैया असवले या चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भैया असवले याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेत सतीश क्षीरसागर हा जागीच ठार झाला, तर विजय सरवदे हा गंभीर जखमी झाला होता. विजय सरवदे याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु सोमवारी, १९ जुलै रोजी त्याचाही मृत्यू झाला.
----
आश्वासनाअंती मृतदेह घेतला ताब्यात
गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या विजय सरवदे याचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची घटना समजताच सिदार्थनगर येथील कार्यकर्त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मारत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. सतीश व विजयच्या नातेवाईकांनी आक्रोश करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके पाठविल्याची ग्वाही देताच नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी घेतला.
---
त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा...
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्र. ८ व ९ मध्ये बोगस मतदार नोंदणी करण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. मतदारांची बोगस मत नोंदणी कुठे करण्यात आली, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असा आक्रोश संतप्त कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी तहसील आवारात केला.
----
फोटो : १९ विजय सरवदे
१९ विजय सरवदे १
पोलीस ठाण्याच्या आवारात ॲम्ब्युलन्समध्ये विजय सरवदे याचा मृतदेह आणून आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी आक्रोश केला.