दिवाळीची पहिली आंघोळ चक्क गटारीच्या पाण्याने, गटार दुरुस्त करण्यासाठी आंदोलन
By शीतलकुमार कांबळे | Published: November 12, 2023 08:24 PM2023-11-12T20:24:40+5:302023-11-12T20:25:00+5:30
शीतलकुमार कांबळे सोलापूर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी रस्त्यावरून वाहणा-या गटारीतील पाण्याने माजी उपसरपंच जीवन ...
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी रस्त्यावरून वाहणा-या गटारीतील पाण्याने माजी उपसरपंच जीवन गावडे आणि राघू कोंढारे यांनी आंघोळ करुन ग्रामपंचायतीवर नाराजी व्यक्त केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघे जणांनी चक्क गटारीच्या पाण्याने आंघोळ केली आहे. चिखर्डे येथील मुख्य रस्त्यावरून गटारीचे पाणी वाहत आहे. या रस्त्याने गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी ये-जा करताहेत. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त बाहेरगावाहून आलेले नागरिक, लहान मुलांची या रस्त्याने वर्दळ दिसते. या रस्त्यावरुन जाणा-या अनेक वाहनांनी गटारीचे पाणी अंगावर उडून देतात.
गटारी दुरूस्ती करून रस्त्यावर येणा-या पाण्याची विल्हेवाट लावावी, याकरिता ग्रामपंचायतीस वारंवार सांगूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. संतापलेल्या माजी उपसरपंचाने गटारीच्या पाण्याने आंघोळ करून लक्ष वेधले.
यावेळी माजी सरपंच आण्णासाहेब कोंढारे, माजी उपसरपंच भगवंत पाटील, सुमंत तुपेरे, संतोष दळवी, सुधीर सवणे, छोटू कोंढारे,पल्लवी गाढवे, विलास कोंढारे, दादा कुरूळे, नंदू गिराम, किरण मसेकर, मुबारक शेख, चंदू गोरे, कृष्णा सवने उपस्थित होते. गावामध्ये शुध्द पाणी व गरम पाणी देण्याबाबतची वचनपूर्ती करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
जुन्या पाईपलाईनचे चेंबर लहान असल्याने ते लवकर भरले जाते. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. या गटारीचे काम तीन ते चार दिवसात पूर्ण करून गटार सुरळीत करण्यात येईल.
- संतोष माने, ग्रामसेवक, चिखर्डे