शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास; सोलापूर जिल्ह्यातील २५०० शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:45 PM2021-10-04T17:45:35+5:302021-10-04T17:46:04+5:30

लोकमत न्युज नेटवर्क

On the first day of school the CEO took a student class; 2500 schools started in Solapur district | शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास; सोलापूर जिल्ह्यातील २५०० शाळा सुरू

शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास; सोलापूर जिल्ह्यातील २५०० शाळा सुरू

Next

सोलापूर : राज्य शासनाने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल अठरा महिन्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. स्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता.

त्यांच्यासमवेत माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी राहुल देसाई, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शाळेचे मुख्याध्यापक कौलगी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
 
शाळेच्या आवारात स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वामी यांनी सांगितले की, कोरोनाची रूग्णसंख्या असल्याने पंढरपूर, माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यातील 50 गावातील शाळा सुरू नाहीत. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व खाजगी माध्यमिक व प्राथमिक  (शहरी, ग्रामीण आणि नागरी) अशा 2549 शाळा आहेत. त्यापैकी 2500 शाळा सुरू झाल्या आहेत. उर्वरित शाळा 10 ऑक्टोबरपासून सुरू होतील. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग आज सुरू झाले. शाळा परिसरात हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असून आजचा दिवस हा शिक्षण उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थी, पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सोलापूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 58 हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 48 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासनाच्या निर्देशानुसार एका बेंचवर एक अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवसाआड विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. सुरू झालेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती होती. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम शाळा बंद असताना लोकसहभागातून राबविल्याने सव्वा दोन हजार शाळा स्वच्छ झाल्या आहेत.

स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यांनी वर्गात कोविडविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी व उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी शाळेला स्वामी यांनी भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी होटगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हत्याळीकर, उपशिक्षक पतंगे, सय्यद, ठाकूर, उपशिक्षिका कुलकर्णी, ढंगे, वनस्कर, जगताप, मजरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सुरवसे, पदवीधर शिक्षक शकीला इनामदार, प्रकाश राज शेट्टी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, केंद्रप्रमुख सी.रा. वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

एकुरके येथील शाळा उत्साहात सुरु

मोहोळ तालुक्यातील एकुरके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्साहात सुरू झाली आहे. पाचवी ते आठवी एकूण पट 105 तर एकूण उपस्थिती 99 होती. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने मुलांचे गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत केले. यावेळी मुलांची थर्मामीटरने तपासणी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत कोल्हाळ, उपसरपंच पृथ्वीराज ढवण, अण्णासाहेब साठे, रमेश ढवण, बापू कारंडे, मुख्याध्यापक सुधाकर काशीद, उपशिक्षक नंदकुमार भडकवाड, प्रफुल्ल शेटे, राजेंद्र मोटे, भागवत वाघ, सुभाष कल्याणी आदी उपस्थित होते.

शाळा आढावा....

एकूण शाळा 2549 
सुरू शाळा 2500 पैकी 1923 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी ग्रामीण.
305 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शहरी.
272 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी नागरी.
एवढ्या शाळा सुरू झाल्या आहेत.

Web Title: On the first day of school the CEO took a student class; 2500 schools started in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.