Teachers Day; पहिली ‘एन्डोस्कोपी’ केली ती प्राध्यापकामुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:28 PM2019-09-05T14:28:14+5:302019-09-05T14:28:44+5:30
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असणाºया डॉ. संजीव ठाकूर यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत शिक्षक ?
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : पुण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी लेक्चरर म्हणून काम करत होतो. दुर्बिणीद्वारे (एन्डोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्याची नवी पद्धत तेव्हा आली होती. अशी शस्त्रक्रिया ही फक्त शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुखच करत होते. कारण फक्त त्यांच्याकडेच एन्डोस्कोपी करण्याची अत्याधुनिक साधने होती. मला अशी शस्त्रक्रिया करायची म्हणून असे साहित्य मी स्वत: खरेदी केले; मात्र अशी शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळत नव्हती. आमचे प्राध्यापक डॉ. बी. एस. दुबे यांनी ही संधी दिल्याने पहिल्यांदा एन्डोस्कोपी करता आली, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, हा अनुभव सांगताना डॉ.व्ही.एम. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.
पुण्यातील ससून रुग्णालयात सेवा देत असताना अतिदक्षता विभागात एक १४ वर्षांचा रुग्ण आला होता. त्याच्या छातीमध्ये दुखत होते.त्याची परिस्थिती पाहून त्याच्या छातीचा एक्स-रे काढला. एक्स-रे पाहिल्यानंतर त्याच्या ह्रदयापर्यंत वेदना पोहोचत असल्याचे माझ्या निदर्शनात आले. त्याची प्रकृती स्थिर नसल्याने आमचे अनुभवी शिक्षक डॉ. व्ही. एस. अंबिले यांना याची कल्पना दिली. ते रुग्णालयात नसल्याने त्यांनीच 'तू निष्णांत सर्जन आहेस, तू शस्त्रक्रिया करु शकतो असा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यामुळेच त्या आणीबाणीच्या काळात मी त्या मुलाचे प्राण वाचवू शकलो. अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!
माझ्या यशाचे श्रेय शिक्षकांनाच...
तसे आपले आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात. पण, शिक्षकांचे योगदानही कमी नसते. अभ्यासाबरोबरच एक माणूस म्हणून घडविताना ते सतत मार्गदर्शन करतात. आपला विद्यार्थी आपल्यापुढे जावा अशी शिक्षकाची मनोमन अपेक्षा असते. ही परंपरा मी माझ्या विद्यार्थ्यांना ज्ञान देताना जपत असतो. आत्तापर्यंत जे मिळवलं ज्या विद्यार्थ्यांना घडवलं याचे श्रेय माझ्या शिक्षकांनाच. समाजात वावरताना कसे वागावे यापासून रुग्णांची सेवा कशी करायची याचे शिक्षण नकळतपणे आपल्या शिक्षकांकडूनच मिळत असते. शाळेपासून सुरु असलेला हा प्रवास पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेईपर्यंत असतो. एवढेच नव्हे तर अडचणीच्या वेळी देखील आपले शिक्षक हे नेहमीच मदत करण्यासाठी तयार असतात. यामुळे २४ वर्षांपासून मी वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना माझ्या शिक्षकांना समोर ठेवून मार्गदर्शन करत असतो. त्यांच्या कार्यामुळेच मला आजही काम करण्याचा आत्मविश्वास मिळत आहे.
२५ हजार लॅप्रोस्कोपिक सर्जरी...
वैद्यकीय शिक्षण असो की रुग्णसेवा या दोन्ही बाजू सांभाळताना आत्मविश्वासाची गरज असते. एकाचवेळी शिक्षक म्हणून काम करणे तसेच सर्जन म्हणून काम करणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच रुग्णांना होेणारा त्रास याचा विचार करावा लागत असतो. पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असतानाचे आमच्या शिक्षकांचे शब्द आजही आठवतात.