Teachers Day; पहिली नोकरी शिक्षकाची, नंतर अधिकारी झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:33 PM2019-09-05T14:33:02+5:302019-09-05T14:34:55+5:30
कॉम्प्युटर इंजिनिअर असलेले मनोज पाटील शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेमुळे स्पर्धा परीक्षेनंतर पोलीस खात्यात रुजू झाले
संताजी शिंदे
सोलापूर : वडील कृषी विभागात शासकीय नोकरदार होते. साताºयातील सैनिक स्कूलमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांमुळे मला शासकीय नोकरीची आवड निर्माण झाली. शाळेत असताना खेळ, व्यायाम आणि अभ्यास या गोष्टी नियमितपणे होत होत्या. होस्टेलवर राहिल्याने मी शिक्षकांच्या शिस्तीत वाढलो. शिकवणाºया शिक्षकांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडला. सैनिक स्कूलमध्ये १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आणि मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तीन वर्षे शिक्षकाची नोकरी केली. नंतर मी पोलीस अधिकारी झालो.
कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यानंतर माझ्यासोबतचे सर्व सहकारी मित्र मोठ्या पगारावर अमेरिका, इंग्लंड आदी विविध देशात नोकरीसाठी गेले. ८0 टक्के मित्र परिवार आज परदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहे. मात्र मी सैनिक शाळेत शिकल्याने माझ्या मनावर शासकीय नोकरीचा प्रभाव होता. सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये मी दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले. नंतर मिरज येथे जाऊन सव्वा वर्ष विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले. यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी स्वत: अभ्यास केला. १९९८ साली मी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस खात्यात अधिकारी पदावर रूजू झालो. अधिकारी नसतो तर आज शिक्षक राहिलो असतो.
जेव्हा शिक्षक मित्र बनतात...
शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी हुशार होतो, आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक हे प्रचंड शिस्तीचे होते. त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, राहणीमान आम्ही निरखून पाहत होतो. पी.टी.चे घाडगे सर हे शिस्तीचे होते. मात्र अन्य वेळी ते चांगले मित्र होते. आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत असत. एस.आर.एस. चौहान, प्रिन्स सर हे शिक्षक आम्हाला वारंवार मार्गदर्शन करीत असत. मी प्रशासकीय सेवेतच जावे, अशी वडील गोविंद पाटील यांची इच्छा होती. मी परदेशात जाऊन नोकरी केली असती. मात्र मला भारतातच राहून आर्मी, एअरफोर्स किंवा प्रशासकीय सेवा करायची होती. अधिकारी म्हणून काम करीत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून एकप्रकारची समाजसेवा करण्यात मला समाधान मिळते. कोणावरही अन्याय होऊ नये, अशी माझी धारणा असते. कायद्यासमोर कोणी मोठा नाही. समाजातील गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, हाच माझा प्रयत्न असतो.
शिक्षकाबद्दल वापरला होता अपशब्द...
शाळेमध्ये माझ्या समविचारी मित्रांचा एक ग्रुप होता, आम्ही सर्व जण नेहमी एकत्र राहत होतो. शाळेत एका मध्यांतरामध्ये आम्ही एकत्र होतो, तेव्हा चेष्टेत एका शिक्षकाबद्दल मी अपशब्द वापरला. नेमकं आमचं हे बोलणं शिक्षकांनी ऐकलं, त्यांनी मला वर्गात बोलावून घेतलं. खूप भीती वाटली होती, मात्र त्यांनी शांतपणे आम्हाला समज दिली. भवितव्याची जाणीव करून दिली, त्यानंतर आम्ही त्यांची माफी मागितली. नंतर तशी चूक केली नाही