६१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून सोलापूर राज्यात पहिला
By दिपक दुपारगुडे | Published: December 23, 2023 07:09 PM2023-12-23T19:09:17+5:302023-12-23T19:09:29+5:30
अनेक साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देत नसल्याने असे कारखाने कसेबसे चार-पाच तासच चालत आहेत.
सोलापूर : जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांचे गाळप ६० लाख ४७ हजार मेट्रिक टन इतके झाले तर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचे गाळप ६ लाख ५२ हजार मेट्रिक टन झाले आहे. जिल्ह्यात यंदा ३४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून गुरुवारपर्यंत ६० लाख ५१ हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. यंदा अनेक साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रणेचा अभाव आहे. बोटावर मोजण्याइतक्या बैलगाड्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने कशीबशी ऊस तोडणी सुरू आहे.
अनेक साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देत नसल्याने असे कारखाने कसेबसे चार-पाच तासच चालत आहेत. मात्र, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री पांडुरंग श्रीपूर, श्री विठ्ठल पंढरपूर अशा काही मोजक्या साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रणा पुरेशी असल्याने ऊस गाळप पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रोची गाळप क्षमता प्रति दिन १८ हजार तर माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रति दिन ११ हजार मेट्रिक टन इतकी आहे. ७ लाख ४३ हजार मेट्रिक टन गाळप करून बारामती ॲग्रो राज्यात पहिला तर ६ लाख ५२ हजार मेट्रिक टन गाळप झालेला विठ्ठलराव शिंदे राज्यात दुसरा आहे. साखर उतारा मात्र बारामती ॲग्रोपेक्षा विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा अधिक आहे. सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप ६० लाख ४७ हजार हेक्टर इतके झाले असून हे गाळप राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.