आधी पंढरपूर-आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आळंदी वारीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:58+5:302020-12-05T04:47:58+5:30
पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानांची पाहणी करणार आहे. तेथील स्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी ...
पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानांची पाहणी करणार आहे. तेथील स्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करून आळंदी येथील यात्रेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूर दौऱ्यात पत्रकारांना दिली.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, पंढरपूर हे राज्याचे गौरवस्थान आहे. वारकरी ही संस्कृती आहे. पंढरपूर देवस्थान, विकास व व्यवस्थेचे भविष्यात काही नुकसान होणार नाही. त्यासंदर्भात विधानभवनात बैठक होईल. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी, वारकरी व अन्य मंडळी उपस्थित राहतील.
अधिवेशनासाठी नवीन नियमावली
सध्या कोरोनाचे संकट संपले नाही. अधिवेशनासाठी जादा लोक येतील. अनेक प्रश्नांवर लोक एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. परंतु दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसे चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल, यावर चर्चा सुरू आहे.
----
केंद्र सरकारने तोडगा काढावा
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतमजुरांच्या विरोधात कृषीविषयक विधेयक पास केले आहे. मजूर व इतर शेतीसंबंधित कामगार यांच्याविरोधात विधेयक पास केल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे. त्या अनुषंगाने दिल्लीमध्ये सर्व राज्यांतून जो शेतकरी वर्ग जमा झाला आहे, यावर केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
.