करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना
By शीतलकुमार कांबळे | Published: April 4, 2024 01:07 PM2024-04-04T13:07:00+5:302024-04-04T13:09:01+5:30
परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे.
करमाळा : करमाळा आगारातील पहिली एसटी बस श्रीराम दर्शनासाठी अयोध्याला रवाना झाली आहे. सोलापूर विभागातून ही पहिली एसटी बस असल्याचे सांगितले जात आहे.
परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे. शेळगावला करमाळा आगर जवळ असल्याने त्यांनी येथील एसटी बस बूक केली होती. आगर प्रमुख होनराव यांनी भक्तांना सोलापूर येथून सुविधायुक्त एसटी बस उपलब्ध करून दिली आहे. श्री रामललाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त अयोध्या येथे जात आहेत. त्यातूनच करमाळा येथूनही एसटी बसने श्री राम भक्त अयोध्याला रवाना झाले आहेत. सात दिवसांचा त्यांचा दौरा आहे.
अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सिल्लोड, जामनेर, रावेर, कुहानपूर, उजैन, भोपाळ, कटनी, रिवा, प्रयागराज, वाराणसी, अयोध्या असा त्यांचा प्रवास असणार आहे. करमाळा आगारातून एसटी बसची पूजा करून अयोध्याकडे गाडी रवाना झाली. चालक नंदकुमार काळे व शहाजी वीर हे एसटी बस घेऊन गेले आहेत.