किल्लारी भूकंपातील मृतांच्या दहनानंतर प्रथमच महामारीत विद्युत दाहिनीवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:16 PM2020-06-20T12:16:00+5:302020-06-20T12:20:16+5:30
कर्मचाºयांचे अनुभव; धुराड्यातून सतत बाहेर पडतोय धूर; नवीन दाहिनीचे काम सुरू
राकेश कदम
सोलापूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये १९९३ साली भूकंप झाला होता. त्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमधून मोठ्या संख्येने मृतदेह मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत आले होते. तेव्हा पहिल्यांदा या विद्युत दाहिनीचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले होते. आता कोरोनाच्या काळात आणखी एका दाहिनीची गरज निर्माण झाली. त्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली.
मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी खरे तर १९८४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ती १९९१ मध्ये बसवण्यात आली. यानंतरच तिचा वापर सुरू झाला. लोक पारंपरिक पद्धतीने लाकडाची चिता रचून दहन करण्यास प्राधान्य देत होते. आजही अनेक लोक देतात.
किल्लारीच्या भूकंपात मरण पावलेल्या अनेक लोकांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. त्यामुळे या मृतदेहांचे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग आठ दिवस अनेक मृतदेह या दाहिनीमध्ये आल्याचे महापालिकेचे मशीन आॅपरेटर शिवलिंग हिरेमठ यांनी सांगितले. हिरेमठ १९९१ पासून विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करीत आहेत. परंतु, या दाहिनीवर कोरोनाच्या काळात पहिल्यांदा मोठा ताण पडल्याचे ते सांगतात.
कोरोनाबाधित मृतदेहांसह न्यूमोनिया किंवा इतर आजाराने बाधित मृतदेहांचे दाहिनीत दहन करण्यात येत आहे. दररोज सरासरी चार ते पाच मृतदेहांचे दहन होत आहे. कारखान्याच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडतो. या दाहिनीत दररोज पाच ते सहा मृतदेहांचे दहन होत आहे. दाहिनीच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडत असल्याचे आजूबाजूचे लोक सांगतात. त्यांनाही या धुराचा त्रास होऊ लागला आहे.
देखभाल मोठे जिकिरीचे काम
- दाहिनीची देखभाल दुरुस्ती हे जिकिरीचे काम असल्याचे मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी सांगतात. दाहिनी सतत तापलेली असते. मृतदेहाचे दहन करताना तापमान ६०० ते ६५० डिग्री असते. दाहिनीचा बाहेरचा पार्ट खराब झाला तर बदलण्यासाठी तापमान कमी होण्याची वाट पाहावी लागते. त्यासाठी एक दिवस तरी जातो. दाहिनीचा आतील पार्ट खराब झाला असेल तर मशीनही बंद ठेवावे लागते. हे थंड होण्यासाठी दीड ते दोन दिवस लागतात. त्यानंतर काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तापविण्यासाठी अर्धा दिवस जात असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. अनेक साहित्य पुण्यावरून मागवावे लागते.
आता अनेक जण रक्षाही मागायला आले नाहीत...
- दाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होते. मृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो. जळाल्यानंतर हाडांची पावडर होते. इतर काळात लोक तिसºया दिवशी ही राख घेऊन जायला येतात. कोरोनाच्या काळात काही मोजके नातेवाईक राख घेऊन गेले. राखेतूनही कोरोना होईल, या भीतीमुळे निम्म्यापेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक राखही घेऊन जायला आले नाहीत.
तो दिवस भीतीदायक
- गेल्या दोन महिन्यात ही दाहिनी तीन वेळा बंद पडली. पहिल्यांदा कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचारी हातात पाना घ्यायला तयार नव्हते. तो दिवस भीतीदायकच होता. या दिवशी विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी पुढे आले. रात्री-अपरात्री या ठिकाणी थांबून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता सर्वांचीच भीती उडाली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईल, असे हिरेमठ म्हणाले.