आधी उपचार अन् नंतर अंत्यविधीसाठी ‘लढत राहिले’ सीमेवरील तैनात दोन जवान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:22 PM2020-06-29T12:22:06+5:302020-06-29T12:29:03+5:30
असंवेदनशीलता : मार्डीतील राजमाने कुटुंबीयासोबत घडलेला प्रकार; झेडपी सीईओंनी घातले लक्ष
राकेश कदम
सोलापूर : आमच्या वडिलांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडून आहे. आता किमान त्यांचा अंत्यविधी तरी वेळेवर करा, अशी आर्त हाक भारतीय लष्करातील जवानांनी सोलापूरच्या प्रशासकीय यंत्रणेला दिली. तरीही प्रशासकीय यंत्रणा हलली नाही.
मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील पंडित राजमाने यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. राजमाने यांची दोन मुले कुमार राजमाने आणि संदीप राजमाने लष्करी सेवेत आहेत. संदीप हे जम्मूमध्ये तर कुमार हे लखनऊ येथे कार्यरत आहेत.
पंडित राजमाने यांना गुरुवारी धाप लागत असल्याने त्यांचे पुतणे शशिकांत राजमाने आणि प्रवीण मुडके यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटलमधील लोक माझ्यावर व्यवस्थित उपचार करीत नाहीत. मला श्वास घ्यायला त्रास होतोय, असे पंडित राजमाने आपल्या मुलांना आणि नातेवाईकांना सांगत होते. शशिकांत आणि प्रवीण यांनी गुरुवारी सिव्हिलच्या डॉक्टरांकडे डिस्जार्च देण्यासाठी तगादा लावला, परंतु रुग्णाचा स्वॅब घेतला आहे. रिपोर्ट आल्याशिवाय त्यांना डिस्जार्च देता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी रिपोर्ट आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
प्रवीण मुडके म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलमधून मार्कंडेयमध्ये नेण्यासाठी एक अॅम्ब्युलन्स आली. ही अॅम्ब्युलन्स पाऊण तास रुग्णालयाच्या बाहेरच उभी होती. आत आल्यानंतर पंडित राजमाने यांना बाहेर आणले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना आॅक्सिजन मिळावा कोणत्याही प्रकारचे उपाय केलेले नव्हते. अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यासाठी लोक मदतीला आले नाहीत.
अखेर आम्हीच ग्लोज घालून त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये दाखल केले. सिव्हिलमधून मार्कंडेयमध्ये पोहोचताच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मृतदेह पुन्हा सिव्हिलमध्ये आणला तर दाखल करुन घ्यायला तीन-चार तास लावले.
अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांचा पंचनामा झाला पाहिजे. पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवू असे सिव्हिल हॉस्पिटलमधील लोकांनी सांगितले. पोलिसांच्या या रिपोर्टची आम्ही रविवारी दिवसभर वाट बघत होतो.
वायचळ यांच्या फोननंतर झाल्या हालचाली
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आणि त्यांचे स्वीय सहायक अविनाश गोडसे यांच्या कानावर घातली. वायचळ यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोन केले. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. सायंकाळी सहा वाजता पंडित राजमाने यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.
मुलांनी व्हिडिओ कॉलवरुन घेतले वडिलांचे अंत्यदर्शन
लष्करी सेवेत असलेली दोन्ही मुले आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी धडपडत होती. रडत रडतच आपल्या व्यथा अधिकाºयांना सांगत होती. सायंकाळी अंत्यविधी झाला. दोघांनीही व्हिडिओ कॉलवरुन वडिलांचे अंत्यदर्शन घेतले.
अधिकारी म्हणाले डिटेल पाठवा बघतो...
कुमार राजमाने यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून लखनऊमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संदीप अद्यापही जम्मूमध्ये कार्यरत आहेत. आपल्या वडिलांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी ते फोनवरुन सिव्हिलमधील डॉक्टरांना फोन करीत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी व्हावा यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिलचे अधिष्ठाता, जिल्हाधिकारी यांना फोन केले. प्रत्येकाने डिटेल माहिती पाठवा. आम्ही कार्यवाही करतो, असे सांगितले, परंतु रविवारी साडेचारपर्यंत हालचाली झाल्या नव्हत्या.