जत्रेच्या मानपानावरून चुलत्याने पुतण्यावर केला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:15 PM2019-05-18T13:15:07+5:302019-05-18T13:16:11+5:30
अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथील घटना; जखमी उपचारासाठी शासकीय रूग्णलात दाखल
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे गावातील जत्रा, बैल पौळा अन्य सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमातील मानपानावरून सख्या चुलत्याने पुतण्यावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३0 वाजता घडली. या गोळीबारातील जखमीवर सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महादेव ऊर्फ सुरेश आण्णाराव पाटील (वय - ४0 ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. महादेव पाटील हा गावातील लायव्वा मंदिराजवळील कॅन्टीनसमोर बसला होता. तेव्हा पिंटु ऊर्फ आण्णाराव पाटील (वय - ३५) हा तेथे आला. त्याने आमच्यावर गुन्हा कशासाठी दाखल केला असा जाब विचारला, यातुन दोघांमध्ये वादावादी झाली. दोघांमध्ये मारामारी होत असताना, लायप्पा बाबुराव पाटील तेथे आला त्याने महादेव यास मारहाण करण्यास सुरूवात केली. याचवेळी श्रीशैल बसप्पा पाटील हा धावत आला व त्याने काठीने मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना मंदिरात बसलेले प्रकाश पाटील बाहेर आले, त्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार सुरू असताना पिंटु पाटील याला दोघांनी बंदुक आणुन दिली. पिंटु पाटील याने बंदुक महादेव पाटील याच्या दिशेने धरून गोळी झाडली व तेथुन पळुन गेला. गोळी महादेव पाटील याच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला. प्रकाश पाटील यांनी महादेव पाटील याला तत्काळ जखमी आवस्थेत कारमध्ये घालुन सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. सध्या महादेव पाटील याच्यावर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.