शेतीच्या वादातून जवानाचा गोळीबार
By admin | Published: July 20, 2014 12:42 AM2014-07-20T00:42:21+5:302014-07-20T00:42:21+5:30
सांगोला तालुक्यातील घटना; भावकीतील महिला ठार
सांगोला : भावकीतील शेतजमिनीच्या वादातून सैन्यातील जवानाने केलेल्या गोळीबारात एक महिला जागीच ठार झाली़ जवानासह दहा जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात अन्य चौघे गंभीर जखमी झाले़ ही घटना शनिवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास सांगोला तालुक्यातील उदनवाडी-पांढरेवस्ती येथे घडली.
उज्ज्वला जयवंत पांढरे (वय ३०) असे जवानाच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्तात्रय तातोबा पांढरे, अर्जुन तातोबा पांढरे, जयवंत तातोबा पांढरे, कुसूम तातोबा पांढरे व सुमन अर्जुन पांढरे अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सांगोला येथील डॉ. धनंजय गावडे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून, गोळीबाराची सर्वत्र चर्चा सुरु होती.
भगवान नामदेव पांढरे, काकासाो नामदेव पांढरे, विष्णू नामदेव पांढरे, नामदेव तुकाराम पांढरे, बिरू नामदेव पांढरे, कलाबाई काकासाो पांढरे, मालन नामदेव पांढरे, पूजा बिरु पांढरे, छाया भगवान पांढरे,विष्णू पांढरे यांची पत्नी व अन्य एक अशी अकरा आरोपींची नावे आहेत़ काकासाहेब व विष्णू नामदेव पांढरे, नामदेव तुकाराम पांढरे यांना ताब्यात घेतले आहे.
तीन वर्षांपूर्वी नाझरे (ता. सांगोला) येथील प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांच्या मालकीची ८.२० एकर शेतजमीन अर्जुन, दत्तात्रय, भीमराव, जयवंत तातोबा पांढरे या चौघा भावांनी खरेदीखत करुन घेतली होती. तातोबा पांढरे व नामदेव पांढरे यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून वाद होता.
शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास नामदेव तुकाराम पांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य बंदूकआणि इतर शस्त्रांसह दाखल झाले़ प्रारंभी हवेत गोळीबार करीत दत्तात्रय पांढरे यांच्या डोक्यात बंदुकीने प्रहार केला. भगवान, काकासाो, विष्णू, नामदेव भगवान पांढरे यांचा साडूभाऊ अशा चौघांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने नामदेव तुकाराम पांढरे यास मारहाण केली.
यानंतर लष्करातील जवान बिरु नामदेव पांढरे याने डबल बोअर बंदुकीने उज्ज्वला जयवंत पांढरे हिच्यावर गोळ्या झाडल्याने ती जागीच ठार झाली़
-------------------------------
भावकीतील भांडणाचे हिंसक पडसाद
अकरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल
तीन आरोपींना अटक
बिरू पांढरे असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव असून, तो जम्मू-काश्मीर-श्रीनगर या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून सैन्यात ट्रेडमन म्हणून कार्यरत आहे़
तो गेल्या आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता.