मच्छिमारांची व्यथा; गावी जाता येईना, कार्ड नसल्यानं धान्य कोणी देईना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 01:12 PM2020-04-21T13:12:16+5:302020-04-21T13:14:26+5:30
इंकडं आड तिकडं विहीर; उजनी पाणलोट क्षेत्रातील शेकडो मच्छिमारांची व्यथा
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभर लॉकडाऊन सुरू आहे. हातावरचं पोट असणाºयांचे हाल सुरु आहेत. उजनी पाणलोट क्षेत्र आणि सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर मच्छीमारी करुन पोट भरणाºयांची उपासमार सुरु आहे. ही सारी मंडळी परजिल्ह्यातील आहेत. धड त्यांना गावीही परत जाता येत नाही. अन् इथे रेशन कार्ड नसल्यामुळे धान्यही कोणी देईना. ‘इकडं आड, तिकडं विहीर’ अशी आमची अवस्था झाल्याची व्यथा मच्छिमारांमधून व्यक्त आहे.
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील पडस्थळ व सोलापूर जिल्ह्याच्या माढा व करमाळा तालुक्यातील उजनी, भीमानगर, पारेवाडी, केत्तूर व उजनी धरण पाणलोट क्षेत्रात शेकडो मच्छीमार हे मत्स्यमारी करुन आपली उपजीविका भागवतात. पण कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये हा मत्स्यमारी करणारा समाज पुरता भरडून निघालाय़ संबंधित व्यवसाय बंद असल्याने पोटाला काय खायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे सध्या आवासून उभा आहे. याबाबत पडस्थळ (ता. इंदापूर) येथील कार्यक्षेत्रातील मच्छिमारांनी तर काही दिवसांपूर्वी यासंबंधी लेखी निवेदनच संबंधित प्रशासनाला दिले होते. पण अद्यापतरी कोणी लक्ष दिले नसल्याचे पांडुरंग कुंढारे यांनी सांगितले.
बीड, परभणी व जालना विभागातून येथे आलेल्या या मच्छिमारांना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तेथील त्यांच्या नातेवाईक बांधवांनी खाण्यासाठी ४० हजारांची मदत केली. मात्र ही मदत तुटपुंजी असल्यामुळे सध्या ते अडचणीत सापडले आहेत. याकडे ना शासनाचे लक्ष, ना समाजातील मदत करणाºया दानशूर व्यक्तींचे़ त्यामुळे मच्छीमारी करणारे सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत.
याबाबत मच्छीमारी करणारे पांडुरंग कुंढारे व छाया भोई यांनी सांगितले की, बीड, परभणी, जालना अशा विविध भागांतून शेकडो मच्छीमार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उजनी धरणाच्या भीमा नदीकाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थायिक आहेत. इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रात भीमा नदीच्या किनारी कांदलगाव, सुगाव, पडस्थळ यासह येथील पाच ते सहा भागात हे मच्छीमार वास्तव्यास आहेत. ते परजिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचे येथे रेशन कार्ड व मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळेच येथील राजकीय मंडळी व शासकीय अधिकारी लक्ष देतात की नाही, असाच प्रश्न या लोकांना पडला आहे.
विनंती करुनही मिळाले नाही धान्य...
लॉकडाऊनच्या काळात शासनाने गोरगरिबांसाठी पाच किलो गहू व तांदूळ मोफत देण्याचे आदेश दिलेत. त्याशिवाय ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांनाही अन्नधान्य पुरवठा करण्याच्या सूचना सरकारने अधिकाºयांना दिल्या आहेत. पडस्थळ गावच्या कुशीत वसलेल्या या ३८ मच्छीमार कुटुंबांनी तेथील ग्रामसेवक व सरपंच यांना विनंती अर्ज करुन आठवडा उलटला, मात्र अद्यापही शासनाचा एकही अधिकारी त्यांच्याकडे फिरकला नाही. चार-पाच वर्षांपासून हातावरचे पोट असणारा हा भोई समाज उजनीच्या फुगवठ्यात आपला मच्छिमारीचा व्यवसाय करत करत संसाराचा गाडा पुढे ओढत होता. पण सध्याच्या काळात त्यांना जगणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्यांना शासनाने व समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.