फिटनेस के फंडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:06 PM2019-04-05T12:06:53+5:302019-04-05T12:08:22+5:30
गावातल्या सरपंचांचं थोरलं पोरगं अलीकडं एकदमच मॉडर्न झालंय. शिकायला पुण्यात गेल्याचा परिणाम, दोस्तांच्या संगतीनं त्यानंही आता टी शर्ट, जीन्स घालायला सुरुवात केलीय.
रविंद्र देशमुख
गावातल्या सरपंचांचं थोरलं पोरगं अलीकडं एकदमच मॉडर्न झालंय. शिकायला पुण्यात गेल्याचा परिणाम, दोस्तांच्या संगतीनं त्यानंही आता टी शर्ट, जीन्स घालायला सुरुवात केलीय. पुण्यातनं इंटरसिटीनं उतरून गावात येताना अन् पुण्याला जाण्यासाठी कुर्डूवाडी गाठताना मोठ्या डौलात जातोय लेकाचा..पण पोरगं मात्र स्वभावानं गोड, थोरामोठ्यांचा आदर करणारं... गावात आल्यानंतर पारावर सर्वांना आवर्जून भेटून ख्याली - खुशाली विचारणारं...त्याचे सरपंच वडील मात्र सारखं पोरावर वैतागलेले...पारावर बसल्यानंतर थोरल्या आबाजवळ सरपंच नेहमी म्हणायचे, कारटं मुलखाचं आळशी हाय. पुण्यातनं इथं आलं की, नुसतं अंथरुणावर लोळत असतं. एक काम ऐकत नाय. तरणंताठं वय हाय पण बघा त्याची ढेरी.. त्याची जाडी. नुसतं जीन पॅन्ट अन् भडक रंगाचे कपडे घालून मिरवत असतया..आबा तुम्हीच सांगा त्याला. जरा व्यायाम करावा, तालमीत मेहनत करावी...आमच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे पैलवानकी करावी...नुसतंच शिकला - सवरला म्हणून काय, त्याला चांगली पोरगी मिळणार हाय व्हय..सरपंच थोरल्या आबांना हे सांगताना अधिकच वैतागून गेले होते.
आबा, उद्या सकाळी त्याला तुमच्याकडं पाठवितो, पारावर. तुमचं ऐकतंया त्यो...जरा त्याला समजून सांगाच..नाही तर उद्या छकाटी घेऊन त्याला पाटं उठविणार हाय अन् तालमीला धाडणार हाय!
थोरल्या आबांची तब्येत म्हणजे एकसवडी, आयुष्यभराचे काडी पैलवान. आता या सरपंचांच्या पोराला काय सांगायचं..जो व्यायाम आपण आयुष्यभर कधी केलाच नाही, त्याच्याबद्दल दुसºयाला काय सांगायचं?...आबा विचार करू लागले..अन् स्वत:शीच पुटपुटले. बघू उद्या, जे सूचल ते सांगू.....दुसºया दिवशी घरातून पाराकडे येताना, आबांना फिटनेसचे फंडे सुचले..भराभर त्यांच्या डोळ्यासमोर पवारसाहेब, शिंदेसाहेब, महाराज अन् बाळासाहेब तरळून गेले...बस्स आता सरपंचाच्या पोराला या नेत्यांची उदाहरणं द्यायची अन् व्यायामाचं महत्त्व सांगायचं...आबांनी ठरवलं.
सरपंचानं बजावल्यानुसार पोरगं सकाळी पारावर आलं. थोरल्या आबांना झुकून नमस्कार केला...आबांनीही त्याला प्रेमानं शेजारी बसवून घेतलं. बेटा, बाप म्हणत हुता तू मेहनत करत नाय, जाडी वाढलीया, रानात कधी जायची वेळ आलीय तर दमछाक व्हतीया तुझी...मग जरा यायाम करत जा, तालमीत जात जा...तुमच्या पुण्यातपण लई तालमी हैती म्हणं. मशनी हायत्या व्यायामाच्या...जरा करत जा तिथं जाऊन मेहनत...सरपंचाचा पिंटू म्हणाला, आबा मला नाही जमत ते.
आबा, समजुतीच्या सुरात म्हणाले, तू नेहमी राजकारणाची चर्चा करतो..सध्या तर इलेक्शनचा माहोल...कालच तू पवारसाहेब,शिंदे साहेबांचं नाव घेत व्हता..कमळवाले महाराज अन् अकोल्यावरून आलेल्या बाळासाहेबांबद्दलही सांगत व्हतास...या नेत्यांकडं बारकाईनं बघ जरा, पवारसाहेब, शिंदेसाहेब तर वयाची पंच्याहत्तरी पार करून गेलेत..माझ्यापेक्षाही दोन - तीन वर्षांनी मोठे हायती; पण प्रचाराला आले की कस्सं तरातरा चालतात. तुझ्यासारख्या तरण्याताठ्यांना लाजविणारा त्यांचा वावर असतो अन् तू बघ.. पारावर चालत येताना तुला दम लागलाय..ह्यो बघ, ह्यो बघ हा पेपर..शिंदेसाहेब कसे त्या काय तर म्हणं बॅरिकेडवर चढून सभेच्या मंडपात जात आहेत. आरं वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी, ह्यो माणूस तरण्यासारखा उड्या मारतोय...आयुष्यभर थोडी मेहनत केली असेल म्हणूनच ते असं हालचाली करत असतील ना!..पवारसाहेब तर बघ, वयानं आणखी थोरले...त्या जीवघेण्या आजारातून स्वत:च्या हिंमतीनं बाहेर पडले अन् कसे राज्यभर दौरे करू लागलेत. काल आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी होतं ते..अंगातून पाणी काढणारं उनं व्हती; पण साहेब थोडेतर थकलेलं दिसले का?..बेटा, तरुणवयात यायाम केल्याचा परिणाम हाय त्यो.
आंबेडकरांचे बाळासाहेबही आता चौसष्ट वर्षाचं हायती, पण तिकडं अकोल्यात बी लढतात अन् सोलापुरात बी...शिवाय दुसºयाचा प्रचार करण्यासाठी दौरे करतात...आयुष्यभर शरीराला कष्ट दिल्याचाच हा परिणाम, बरं का बेटा. कमळवाले महाराज बी साठी पार केलेले...गावोगाव जाऊ लागलेत...सकाळी सकाळी लोकांना वॉकिंगच्या ठिकाणी जाऊन भेटू लागलेत...ना थकवा, ना कंटाळा.
बेटा, कर जरा इच्चार..जर या वयातच मेहनत कर म्हणजे म्हातारपणातही तरणा दिसशील...नाही तर नुसतं कपडे घालून मिरविण्यात काय हाशील?...सरपंचाच्या पोराला आबांनी सांगितलेले फिटनेसचे फंडे पटले...अन् थोरल्या आबांना नेत्यांसारखं चपळ राहण्याचा शब्द देऊन तो घराकडे परतला. -