घरगुती वीज वापरामध्ये साडेपाच टक्क्यांनी वाढ; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:42 PM2020-12-22T12:42:29+5:302020-12-22T12:43:24+5:30
आता ९७.१ टक्के नागरिकांच्या घरात वीज जोडणी
सोलापूर : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचव्या अहवालानुसार (२०१९-२०) जिल्ह्यातील घरगुती वीज वापरामध्ये ५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६-१६ मध्ये ९१.५ टक्के घरामध्ये वीज होती. २०१९-२० मध्ये ९७.१ टक्के नागरिकांच्या घरात वीज पोहोचली आहे.
जिल्ह्यातील ९७.१ टक्के घरामध्ये वीज वापरण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारचे धोरण व योजनेच्या अंमलबजावणीमुळे ही वाढ झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील ९०.४ टक्के घरामध्ये पिण्यायोग्य पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ८७.६ टक्के इतके होते. मागील पाच वर्षांमध्ये यात २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ६७.८ टक्के नागरिकांच्या घरामध्ये स्वच्छतेच्या (शौचालय) सोयी आहेत.
२०१५-१६ मध्ये हे प्रमाण ५३.१ टक्के इतके होते. यात १४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पारंपरिक ऊर्जास्त्रोताच्या वापरात कमी होऊन स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्येदेखील वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी स्वच्छ ऊर्जेचा वापर हा ५०.७ टक्के घरामध्ये होत होता. आता तो ७३.१ टक्के इतका झाला आहे. शासनातर्फे घरगुती एलपीजी व इतर अपारंपरिक इंधनाच्या वापर करण्यासाठी प्रोत्साहन व सवलत दिली जाते. यामुळे ग्रामीण भागात लाकडाऐवजी स्वच्छ ऊर्जास्त्रोतांच्या वापरात वाढ झाली आहे. याचा चांगला परिणाम हा पर्यावरणवरही होतो.
१९ जून ते ३० डिसेंबर दरम्यान सर्वेक्षण
केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हे १९ जून २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले. जिल्ह्यातील १००३ महिला, तर १५३ महिलांचे मत या सर्वेक्षणात विचारात घेण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मनेजमेंट रिसर्च (आयआयएचएमआर) यांच्यातर्फे घेण्यात आला.