सोलापूरातील ‘त्या’ पाच निराधार कन्यांना मिळाला आधार!, शैक्षणिक, धान्याची मदत : ‘सिध्देश्वर’चे माजी विद्यार्थी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:32 PM2017-11-18T13:32:58+5:302017-11-18T13:33:31+5:30
पित्यानेच मातेचा खून केला... पिता सध्या जन्मठेप भोगतोय... ज्यांचा आधार होता, त्या सत्तरवर्षीय आजोबांनीही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनांमुळे बोराळे (ता. मंगळवेढा) येथील वाघमारे यांच्या घरातील निराधार झालेल्या पाच शाळकरी कन्यांना सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने मदतीचा हात दिला
रवींद्र देशमुख
सोलापूर दि १८ : पित्यानेच मातेचा खून केला... पिता सध्या जन्मठेप भोगतोय... ज्यांचा आधार होता, त्या सत्तरवर्षीय आजोबांनीही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनांमुळे बोराळे (ता. मंगळवेढा) येथील वाघमारे यांच्या घरातील निराधार झालेल्या पाच शाळकरी कन्यांना सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने मदतीचा हात दिला असून, या मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च आणि वर्षभर पुरेल इतक्या सर्व प्रकारच्या धान्याचा खर्च या संघटनेने उचलला आहे.
बाबुराव वाघमारे या बोराळेतील इसमाने आपणास सलगपणे पाच मुलीच झाल्याबद्दल दोन वर्षांपूर्वी पत्नीचाच खून केला. या खुनाबद्दल बाबुरावला जन्मठेपेची शिक्षा झाली. सहावीत शिकणारी मंजुळा, पाचवीतील संजीवनी, तिसºया इयत्तेत जाणारी मुक्ता आणि नीरा व अगदीच लहानगी पहिल्या वर्गातील मंगलाला सांभाळण्याची जबाबदारी आजोबा दामोदर वाघमारे आणि आजी जनाबाई यांच्यावर आली. मुलगा बाबुरावला जन्मठेप झाल्याचे समजल्यावर आता या वार्धक्यात या मुलींना कसे सांभाळायचे? या चिंतेने दामोदर वाघमारे यांनी आत्महत्या केली. मुली पुरत्या निराधार झाल्या.
सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांना या दुर्दैवी घटनेची माहिती माध्यमांमधून समजताच संघटनेचे अध्यक्ष देविदास चेळेकर, खजिनदार महिंद्र सोमशेट्टी, संजीव रंगरेज, भारत जाधव, अनिल शहा आदींनी मंगळवेढ्याच्या शशिकांत चव्हाण यांच्या मदतीने बोराळे गाठले. गावकºयांशी संवाद साधून वाघमारे यांच्या पाच मुलींचे पालकत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलींच्या आजी जनाबाई यांनी होकार दिल्यानंतर माजी विद्यार्थी संघटनेने निधीची जमवाजमव केली. पुढील आठवड्यात या निराधार मुलींना संघटनेच्या वतीने शैक्षणिक व अन्नधान्यासाठी आर्थिक मदत देण्यात येईल, असे चेळेकर यांनी सांगितले.
----------------
माजी विद्यार्थ्यांचे कार्य
माजी विद्यार्थ्यांची संघटना ही मुख्यत्वे ‘गेट टुगेदर’ आयोजित करण्यासाठी स्थापन केलेली असते; पण सिद्धेश्वर हायस्कूलमधील १९८७-८८ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे. सोलापुरात जुनी हातगाडी ओढून वस्तूंची वाहतूक करणाºया वृद्ध महिलांना संघटनेच्या वतीने नवीन हातगाड्या खरेदी करून दिल्या. शिवाय रविवार पेठेतील गोपाळ प्रशाला ही शाळा दत्तक घेऊन इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी केली. विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य दिले. आमचे सामाजिक कार्य असेच सुरू राहील, असे अध्यक्ष देविदास चेळेकर यांनी सांगितले.