सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:54 PM2024-05-30T23:54:32+5:302024-05-30T23:54:57+5:30
शेटफळजवळील घटना : जखमी सहा जणांवर उपचार.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : तुळजापूर देवदर्शन उरकून सोनारसिद्धचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या कारला समोरून भरधाव कारची जोरात धडक बसली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले.
हा अपघात गुरुवार, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यात शेटफळ हद्दीत झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपघातातील कार (एम. एच. १२ / एच. एफ. ३४९६) मधून ३० मे रोजी ११ भाविक हे तुळजापूर येथे देवदर्शन उरकून पुढे कुर्डवाडीत सोनारसिद्ध येथे गेले. तेथील देवदर्शन उरकून पुढे पंढरपूरला जात असताना सायं. ६ वाजता आष्टी गावच्या हद्दीत कारमधील लहान मुलगा सिद्धार्थ मारुती सूर्यवंशी (वय ६ महिने) हा खूप रडू लागला. चालक विशाल माने याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी केली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कार (एम एच ०१ / बी. के. ८५८२) ने राँग साइडने येऊन धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी होऊन सृष्टी अण्णा सूर्यवंशी (वय ७, रा. लांडेवाडी, ता. खटाव), जगूबाई धनाजी सूर्यवंशी (वय ५०, रा. मासुरणे, ता. खटाव), विशाल राजाराम माने (वय ३०, रा. मासुरणे), सुवर्णा पांडुरंग बाबर (वय ४२, रा. वाळूज, ता. खानापूर, जि सांगली), लहान बाळ सिद्धार्थ आणा सूर्यवंशी (वय ६ महिने, लांडेवाडी, ता. खटाव) हे पाच जण जागीच ठार झाले तर कोंडाबाई किसन पवार (वय ७०, रा. मासुरणे), सुनीता अण्णा सूर्यवंशी (वय ४५, रा. लांडेवाडी, ता. खटाव), अजय धनाजी सूर्यवंशी (वय २५, रा. मासुरणे), ऋतुजा विशाल माने (वय २३, रा. मासुरणे), त्रिशा पांडुरंग बाबर (वय १३, रा. वाळूज, ता. खानापूर), आदविका विशाल माने (वय अडीच वर्षे, रा, मासुरणे) हे सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी कारचालक डॉ. धीरज दिलीप सरोदे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भागवत करत आहेत.