सोलापूर जिल्ह्यातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:51 AM2020-07-15T11:51:15+5:302020-07-15T11:53:38+5:30
सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात एप्रिल महिन्यापासून आॅपरेशन बंद
सोलापूर : जिल्ह्यामधील सुमारे ५०० ज्येष्ठ नागरिक हे प्रकाशाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद असल्याने याचा परिणाम झाला आहे. मागील चार महिन्यांपासून अशीच परिस्थिती असून ज्येष्ठ नागरिक हे शस्त्रक्रिया कधी होईल, याची वाट पाहत आहेत.
सोलापुरातील सिव्हिल आणि मदर तेरेसा हॉस्पिटलसोबतच करमाळा, पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय तर माढा, सांगोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होते. जून महिन्यात सांगोला येथे शस्त्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून माढा व करमाळा येथे जुलै महिन्यात शस्त्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, अशा रुग्णांना तत्काळ रुग्णालयात बोलावण्यात येत आहे.
शस्त्रक्रिया होत असलेल्या सर्व रुग्णालयांना रुग्णांची यादी करण्यास सांगण्यात आले आहे. या यादीत किती जणांचा मोतीबिंदू पिकला आहे हे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारच्या रुग्णावर प्रथम शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
खासगी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला दहा हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मात्र राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक याचा लाभ घेतात.
ओपीडीमध्ये सरासरी १० रुग्ण...
जवळच्या एखाद्या गावात बाजार असल्यास डोळे तपासण्यासाठी आधी १५० लोक यायचे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज फक्त सरासरी १० रुग्ण येतात. यापैकी एक किंवा दोघांनाच शस्त्रक्रियेची गरज असते. बºयाच ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था नाही. तसेच लोकही कोरोना विषाणूला घाबरून तपासणीला येत नसल्याने ओपीडीमध्ये कमी संख्येने रुग्ण येत आहेत. वयाच्या ५० वर्षांपुढील व्यक्तीमध्ये मोतीबिंदू होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे रुग्णाला अंधुक दिसते. यावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे रूपांतर हे काचबिंदूमध्ये होते.
एप्रिल महिन्यापासून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. सांगोल्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली असून, काही दिवसात माढा आणि करमाळा येथेही सुरू करणार आहोत. सिव्हिलमध्ये सध्या फक्त गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करत आहोत. पीपीई किट, मास्क आदी सर्व सुरक्षेची काळजी घेऊन शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
- डॉ. गणेश इंदूरकर, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक