साडेचौदा लाखाच्या गुटख्यासह पाच लाखाचा टेम्पो जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:23+5:302021-05-07T04:23:23+5:30
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या विशेष पथकाने सांगोल्यात छापा टाकून १ लाख ७५ हजार रुपयांच्या गुटख्यासह १ ...
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या विशेष पथकाने सांगोल्यात छापा टाकून १ लाख ७५ हजार रुपयांच्या गुटख्यासह १ लाखाची कार पकडून कारवाई केली होती. त्यानंतर सांगोला पोलिसांनी संशयावरून सुमारे १४ लाख ६४ हजार ४२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडून मोठी कारवाई केली.
पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस नाईक महेश पवार व पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख हे दोघे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सांगोला - चिंचोली रोड, वंदे मातरम चौकात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एमएच १४ जीडी ५२४४ हा आयशर टेम्पो संशयास्पद स्थितीत मिळून आला. याबाबत चालकाकडे कसून चौकशी केली असता त्याने टेम्पोमध्ये विमल पान मसाला, तंबाखूजन्य जर्दा, बोंबील, भुसा, कांदे असल्याचे सांगितले.
याबाबत सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी हसन सिराज शेख (रा. कोंढवा बु., पुणे), अल्लाबक्ष अब्दुल गनी बागवान (रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास सहा. पोलीस फौजदार कल्याण ढवणे करीत आहेत.
-----
असा आढळला साठा
पोलिसांनी सदर टेम्पो पोलीस स्टेशनला आणून सहा. पोलीस फौजदार कल्याण ढवणे यांनी दोन पंचांसमक्ष टेम्पोची तपासणी केली. यावेळी टेम्पोत १२ लाख ६३ हजार १२० रुपयांचा विमल पान मसाला, २ लाख १ हजार ३०० रुपयांचा व्ही १ सुगंधीत तंबाखू असा एकूण १४ लाख ६४ हजार ४२० रुपये किमतीचा ४१ पोती विमल पान मसाला गुटख्यासह ५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा सुमारे १९ लाख ६४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-----
सांगोला पोलीस स्टेशन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयावरून प्रतिबंधित ४१ पोती विमल पान मसाला व सुंगधीत तंबाखू असा गुटखा पकडलेल्या टेम्पोचे हे छायाचित्र.