सोलापुरातील मेंदुमृत माउलीच्या अवयवदानानं पुण्यातील पाच रुग्णांना मिळालं जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 06:12 PM2022-07-27T18:12:46+5:302022-07-27T18:12:52+5:30
ग्रीन कॉरिडॉर : एक किडनी अन् डोळे सोलापुरात, लिव्हर, दुसरी किडनी पुण्याला
सोलापूर : घरात चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले अन् ६४ वर्षांच्या वृद्ध माउलीच्या डोक्यावर आघात झाला. उपचारानंतर मेंदुमृत झाल्याचे घोषित झाल्यानंतर नातलगांनी अवयवदानाला होकार दिला अन् मंगळवारी दुपारी ग्रीन कॉरिडाॅर पार पडले. त्या माउलीच्या त्यागामुळे पाच रुग्णांना जीवनदान मिळाले. यातील एक किडनी आणि लिव्हर पुण्याला, तर दुसरी किडनी आणि दोन डोळे सोलापुरातील गरजू रुग्णांना मिळाल्याने त्यांना जीवनदान मिळाले.
यातील अधिक माहिती अशी की, लातूर शहरात राहणाऱ्या ६४ वर्षीय आजीबाई २३ जुलै रोजी घरामध्ये चक्कर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर आघात झाला. स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नातलगांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान डॉक्टरांना रुग्णाचा मेंदू काम करत नसल्याचे लक्षात आले. यासंबंधी त्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना कल्पना देऊन अवयवदानविषयी माहिती दिली. यामुळे अन्य रुग्णांना जीवनदान मिळू शकते, याबद्दल माहिती देण्यात आली.
पुढील उपचारासाठी रुग्णाला २४ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास सोलापुरातील मल्टि स्पेशालिटी खासगी हॉस्पिटलमध्ये आणले. उपचारादरम्यान रुग्णाचा मेंदुमृत असल्याचे २६ जुलै रोजी पहाटे पावणेचार वाजता घोषित करण्यात आले. नातेवाइकांनी संमती दिल्यानंतर अवयवदान प्रक्रिया राबविण्यात आली. पुणे येथील ZTCC यांच्याकडून अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली.
त्यानुसार एक किडनी यशोधरामधील नोंदणीकृत रुग्णाला, एक किडनी पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये व लिव्हर पुण्यातल्याच सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन येथील रुग्णाला देण्यात आले. तसेच दुसरी किडनी पुण्याला आणि दोन डोळे (नेत्रपटल) सोलापुरातील नवनीत हॉस्पिटलमधील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले.
या प्रक्रियेसाठी यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर, डॉ. नील रोहित पैके, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ विपुल पाठक, डॉ मुक्तेश्वर शेटे, डॉ. आशिष भुतडा, डॉ. प्रीतेश पवार यांनी काम पाहिले. यासोबतच अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुकांत बेळे, भीमराव देशपांडे, डॉ. अक्षय शेंदरे, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.
----
दहा मिनिटात शहराबाहेर
अवयवदान प्रक्रिया मंगळवारी दुपारी ३.३० ते ३.४० या दहा मिनिटाच्या कालावधीत पार पाडली. वाहतूक शाखेसह पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. हॉस्पिटल ते कलेक्टर बंगला, डफरीन चौक, पार्क चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे नाक्यापासून शहराबाहेर रुग्णवाहिका पुण्याकडे रवाना झाली.
----