धावणे खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप
By admin | Published: May 8, 2014 08:53 PM2014-05-08T20:53:47+5:302014-05-09T09:41:42+5:30
सहकारी पतसंस्थेचे सचिव बजरंग धावणे (४५) यांचा सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपावरून पंढरीनाथ पवार (४0) याच्यासह पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव बजरंग धावणे (४५) यांचा सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपावरून पंढरीनाथ पवार (४0) याच्यासह पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी जन्मठेप व प्रत्येकी १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रकाश उर्फ बुद्धा रामचंद्र शिंदे (२५), सोन्या मेटकरी , पंढरीनाथ पवार, गहिनीनाथ गोवर्धन धावणे (४६), प्रशांत पांडुरंग सावंत (४२) अशी शिक्षा झालेल्यांची नावे असून, अमर माने याची सबळ पुराव्याअभावी निदार्ेष मुक्तता करण्यात आली. बजरंग धावणे हे १६ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी साडेबारा वाजता पडसाळी व मसलेचौधरी गावाच्या हद्दीजवळ मोटरसायकलीवरून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान धावणे यांचा मृत्यू झाला होता़ त्यांचा मुलगा स्वप्निल (१६) याने दिलेल्या फिर्यादीवरून मारेकर्यांविरूद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केलेल्या तपासावरून पंढरीनाथ पवार यानेच सुपारी देऊन धावणे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलिसांनी पतसंस्थेचा इतिहास तपासला. त्यावेळी धक्कादायक कहाणी समोर आली. पंढरीनाथ पवार, गहिनीनाथ धावणे, प्रशांत सावंत हे सचिव कोण व्हायचे आणि कर्ज व लाभांश वाटपावरून बजरंग धावणे यांना धारेवर धरत होते. त्यांच्यावर पाळत ठेवली. पंढरीनाथ याला ताब्यात घेतल्यावर गुन्हा उघड झाला. त्याला सचिव व्हायचे होते पण बजरंग पद सोडत नव्हते. त्यामुळे चिडून इतरांच्या मदतीने पवार यांनी सोन्या मेटकरी व प्रकाश याला चार लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी सहा जणांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस सरकारतर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजू एकूण घेत न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)