पाच रुपयांची गोष्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:16 PM2019-05-16T12:16:31+5:302019-05-16T12:18:15+5:30
भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांचा व त्यातील उपकलमांचा संक्षिप्त स्वरूपात समावेश असलेले एक पुस्तक.
भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांचा व त्यातील उपकलमांचा संक्षिप्त स्वरूपात समावेश असलेले एक पुस्तक लिहून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ११४ व्या जयंतीदिनी प्रकाशित करण्याचा निश्चय मी सुमारे वीस वर्षांपूर्वी केला होता. त्यादृष्टीने ते पुस्तक लिहून सोलापुरातीलच प्रिंटिंग प्रेसमध्ये मी छपाईस टाकले होते, पण इथे एक छोटीशी अडचण आली व पुस्तकाची छपाई ठरलेल्या वेळेत पूर्ण झाली नाही. तरीही प्रकाशनाच्या आदल्या दिवशी, १३ एप्रिल २००५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास व्यवस्थित बार्इंडिंग केलेली व प्रकाशनासाठी सज्ज असलेली एक प्रत महत्प्रयासाने मी त्या प्रिंटिंग प्रेसमधून घेतली.
पुस्तकाची प्रत हातात आलेली नसल्यामुळे त्याच्या प्रकाशनाबाबतची बातमी तोपर्यंत आम्ही माध्यमांना देऊ शकलो नव्हतो. पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी म्हणजे चौदा एप्रिल रोजी सकाळी लवकर उठून मी पुन्हा प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलो. तेव्हा पुस्तकाच्या पन्नास प्रती तयार होत्या; पण त्यांचे बार्इंडिंग अजून ओले होते. त्यामुळे दुपारी दोन-अडीच वाजता त्या मिळतील, असे मला समजले. आता काहीसा आश्वस्त होऊन मी हुतात्मा स्मृती मंदिरासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे गेलो. तेथे मी बाबासाहेबांना अभिवादन केले व ओळखीच्या लोकांच्या भेटीगाठीत रमलो. आदल्या दिवशी बातमी पोहोचवायला उशीर होऊनही सोलापुरातील पत्रकार मित्रांनी पुस्तक प्रकाशनाबाबतची बातमी वर्तमानपत्रांत छापली होती. त्यामुळेही मी आनंदात होतो व परिचयातील लोकांना माझ्याजवळील संक्षिप्त राज्यघटनेची प्रत मी मोठ्या अभिमानाने दाखवत होतो. यावेळीसुद्धा अनेकांनी मागूनही राज्यघटनेची ती प्रत मी कोणालाही दिली नाही.
थोड्या वेळाने पांढरा शर्ट व खाकी हाफ पॅन्ट अशा वेशातील दहा-बारा वर्षे वयाचा एक मुलगा तेथे आला व बाजूच्या एका पुस्तकाच्या स्टॉलजवळ जाऊन ‘पाच रुपयांचे एखादे पुस्तक आहे का?’ अशी विचारणा करू लागला. आजूबाजूच्या दोन-तीन स्टॉलवर चौकशी करूनही त्याला पुस्तक काही मिळाले नाही. कमीत कमी दहा रुपयांचे पुस्तक आहे, असे एका विक्रे त्याने त्याला सांगितले. परंतु तरीही त्याची शोधाशोध सुरूच होती.
बाबासाहेबांची जयंती जेथे साजरी होत आहे, तेथून एखाद्या गरीब मुलाला पैसे कमी असल्यामुळे पुस्तक न घेताच परतावे लागणे ही योग्य बाब नाही; ती तर नामुष्कीची गोष्ट आहे, असा विचार यावेळी माझ्या मनात आला. त्यामुळे ताबडतोब त्या मुलाला मी माझ्याजवळ बोलावून घेतले. काल संध्याकाळी जरी मी थोडासा निराश होतो, तरी आज सकाळी बार्इंडिंग केलेली पन्नास पुस्तके मी माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेली होती. त्यामुळे आता मला कसलीही चिंता नव्हती. त्यामुळे खिशातील संक्षिप्त राज्यघटनेची ती एकमेव प्रत मी बाहेर काढली आणि त्या मुलासमोर धरली. त्या मुलाने त्याच्याकडील पाच रुपये मला देऊ केले; पण मी ते नाकारले व म्हणालो, ते राहू देत तुझ्याकडेच !
यानंतर खूश होऊन जणू आनंदात उड्या मारतच रस्ता ओलांडणाºया त्या मुलाकडे मनातल्या मनात हसतच काही वेळ मी पाहत राहिलो. आता कोणाला दाखविण्यासाठी माझ्याकडे संक्षिप्त राज्यघटनेची एकही प्रत शिल्लक नव्हती. त्यामुळे यानंतर शांतपणे गाडीला किक मारून मी माझ्या घराकडे परतलो. त्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरातील ‘सम्यक विचार मंच’च्या मिलिंद व्याख्यानमालेदरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या त्या पुस्तकाच्या आतापर्यंत अकरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत व बहुधा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी पोहोचल्या आहेत.
- डॉ. रविनंद नामदेव होवाळ
(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)