टॉवेल्सच्या किमतीत पाच रुपयांची वाढ; केमिकल्सचे दर वाढल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:39 PM2020-12-22T12:39:38+5:302020-12-22T12:40:55+5:30
टॉवेल्स निर्मितीसाठी सुताबरोबरच ब्लिचिंग पावडर, कलर केमिकल्स, डाईनचा वापर केला जातो
सोलापूर : केमिकल्स आणि पॅकिंग मटेरिअल्स दहा टक्क्यांनी महागल्यामुळे सुतापासून तयार होणाऱ्या सोलापुरी टॉवेल्सच्या किमतीत प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. टॉवेल्स हे पाचशे ग्रॅमपर्यंत वजनाचे असल्याने टॉवेलच्या किमती पाच रुपयांनी वाढतील, अशी माहिती सोलापूर यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सोमवारी दिली. यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. तीत दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. टॉवेल्स निर्मितीसाठी सुताबरोबरच ब्लिचिंग पावडर, कलर केमिकल्स, डाईनचा वापर केला जातो. याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे टॉवेल्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीची लगेचच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात चादरींसाठी लागणाऱ्या सुतामध्ये तसेच २० एस, १६ एस आणि अन्य काऊंट्समध्ये २० टक्क्यांहून अधिक भाववाढ झाल्यामुळे चादरींचे दर किलोेमागे दहा रुपयांनी वाढविले होते. आता टॉवेल्सची दरवाढ करण्यात आली आहे.
चाळीस टक्के निर्यात
सोलापुरात उत्पादित होणाऱ्या टॉवेल्सपैकी ४० टक्के उत्पादनांची निर्यात केली जाते. युरोपातील सर्व देश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, आखाती देश आणि ऑस्ट्रेलियात सोलापुरी टॉवेल्सला मोठी मागणी आहे. दरवर्षी ७०० कोटी रुपयांची निर्यात होत असल्याची माहिती गड्डम यांनी दिली.