कुरुक्षेत्रला जाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच सरपंचांनी केला विमानप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:23 PM2019-02-11T14:23:46+5:302019-02-11T14:26:46+5:30
सोलापूर : स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया सोलापूर जिल्ह्यातील पाच महिला सरपंच व दोन ग्रामसेविकांना हरियाणातील ...
सोलापूर : स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया सोलापूर जिल्ह्यातील पाच महिला सरपंच व दोन ग्रामसेविकांना हरियाणातील कुरूक्षेत्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाºया स्वच्छ शक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी या सात जणींना प्रथमच विमानप्रवास करण्याची संधी मिळाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी ही निवड केली आहे. स्वच्छ शक्ती कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी निवड झालेल्यांमध्ये तावशीच्या (पंढरपूर) सरपंच सोनाली यादव, ग्रामसेविका ज्योती पाटील, वडाळ्याच्या सरपंच छाया कोळेकर, भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके, अर्धनारीच्या (मोहोळ) सरपंच सुनंदादेवी पवार, देगावच्या (मंगळवेढा) सरपंच राणी ढेकळे, रेडेच्या (माळशिरस) ग्रामसेविका शीला साळवे यांचा समावेश आहे.
समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. कुरूक्षेत्र येथे ११ व १२ फेब्रुवारी रोजी स्वच्छ शक्ती कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्ली येथे हे पथक विमानाने रवाना झाले. केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय रंगविण्याची स्पर्धा घेतली आहे. त्यामध्ये वरील ग्रामसेवक व सरपंचांनी शौचालये रंगविली आहेत. यामध्ये रंगीत चित्रमयरित्या पेंटिंग्ज केल्याने शौचालये आकर्षक दिसू लागली आहेत. वडाळा येथे सर्वाधिक एक हजार तीस शौचालये रंगविण्यात आली आहेत.