सोलापुरातील पाच हजार लोकांना ‘डोळे येणे’ आजाराची लागण
By Appasaheb.patil | Published: August 11, 2023 08:18 PM2023-08-11T20:18:08+5:302023-08-11T20:18:16+5:30
योग्य काळजी घेतल्यास डोळे येण्यापासून दूर राहाल असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
सोलापूर : सोलापूर शहरासोबतच अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील आठ दिवसात सोलापूर शहरात ४०६ तर ग्रामीण भागातील ४२८२ जणांचे डोळे आल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता न ठेवणे आणि डोळ्यांना वारंवार हात लावल्याने डोळे येत असल्याची माहिती समोर आली आहे. योग्य काळजी घेतल्यास डोळे येण्यापासून दूर राहाल असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे.
घराबाहेर पडू नका, विलगीकरण गरजेचे..
डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे असल्याचे मत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी व्यक्त केले आहे.