"पाच वर्षाच्या आमदार, खासदारांना पेन्शन आहे; आम्ही आयुष्य घालवतो, आम्हाला का नाही!"
By संताजी शिंदे | Published: March 15, 2023 06:49 PM2023-03-15T18:49:53+5:302023-03-15T18:52:57+5:30
'एक मिशन, जुनी पेन्शन' या सह अन्य विविध मागण्यांसाठी पदोन्नती मिळालेल्या वर्ग २ व वर्ग ३,४ संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून आंदोलनाला सुरूवात केली आहे.
सोलापूर - पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या आमदार, खासदारांना ५० हजारा पेक्षा जास्त पेन्शन आयुष्यभर दिली जाते. आम्ही आयुष्यभर सेवा करतो, निवृत्ती नंतर आम्हाला पुरेशी पेन्शन नको का? असा सवाल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आला. दिवसभर महिला कर्मचारीही भर उन्हात रस्त्यावर बसून होत्या.
'एक मिशन, जुनी पेन्शन' या सह अन्य विविध मागण्यांसाठी पदोन्नती मिळालेल्या वर्ग २ व वर्ग ३,४ संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद समोरील पुनम गेट समोर सकाळी १०.३० वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. शहरातील विविध शासकीय कार्यालयातून व तालुका स्तरावरील कर्मचारी व अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. विविध कामगार संघटनांच्या नेत्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती.
महिला व पुरूष कर्मचाऱ्यांनी 'एक मिशन, जुनी पेन्शन' हे घोषवाक्य लिहीलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. नेत्यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शन मिळाली नाही तर आगामी काळात सत्ताधाऱ्यांना मतदान करायच नाही असा सल्ला दिला. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
कर्मचाऱ्याची सायकल रॅली
एक कर्मचारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपूरहून सायकलवर सोलापुरात आला होता. पांढरी पॅन्ट, पांढरा टि शर्ट व पांढरे झेंडे लावून तो कर्मचारी आंदोलनस्थळी आला. या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष वेधले जात होते.