पाच वर्षांपूर्वी मयत व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर मुंबईत राहणाऱ्याचा अहवाल दिला निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:24 AM2021-08-26T04:24:50+5:302021-08-26T04:24:50+5:30
सांगोला : चक्क पाच वर्षांपूर्वी मयत झालेल्या इसमाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह देऊन आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, ...
सांगोला : चक्क पाच वर्षांपूर्वी मयत झालेल्या इसमाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह देऊन आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, गावाला शाॅक दिला आहे. यलमार मंगेवाडी (ता. सांगोला) येथे हा प्रकार घडला. एवढ्यावरच न थांबता मुंबईत रहिवासी असलेल्या एका इसमाचा रिपोर्टही निगेटिव्ह देण्याचा प्रताप केला आहे.
यामुळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारावर सारवासारव करीत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आशा वर्करकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली आहे.
यलमार मंगेवाडी गावातील कै. बजरंग सीताराम शिंदे यांचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मात्र आरोग्य विभागाने ३ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला आहे. इतकेच नव्हेतर, याच गावातील दत्तात्रय चौगुले हे मुंबईत मुलीकडे रहिवासी असताना त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह दिल्याने त्यांचे कुटुंबही आवाक् झाले आहे. दरम्यान, गावातील संबंधित व्यक्ती हयात व गावात नसताना आरोग्य विभागाने त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
----
ऑनलाइन माहिती भरताना म्हणे कन्फ्युज
यलमार मंगेवाडी गावात आशा वर्करकडून कोरोना रुग्णांचा सर्व्हे करताना त्या कुटुंब प्रमुखाचे नाव ऑनलाइन माहिती भरताना नावात कन्फ्युजन झाले. शिवाय त्यांच्या घरातील कोणीतरी व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यामुळे चुकून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखविला गेला. तर कीर्तिमाला पवार या आरोग्य सेविकेबद्दल नागरिकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गावात चौकशीअंती काही निष्पन्न झाले नाही. तरीही त्यांना समज देऊन नोटीस दिली असल्याचे सांगोला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमला दोडमणी यांनी या प्रकाराबद्दल स्पष्ट केले आहे.