दोन दिवसात सोलापूरला औषधांचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा उच्च न्यायालयात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 03:03 PM2021-05-13T15:03:49+5:302021-05-13T15:11:04+5:30
भाजप नेत्यांनी दिला महाविकास आघाडी सरकारला इशारा
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारचा कारभार निष्क्रिय असून या कोरोना काळात सरकार कडून सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होतोय. सोलापुरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. त्यासोबत रेमेडेसिविर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. पुढील दोन दिवसात सोलापूरला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास सरकार विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांनी सांगितले.
सोलापूरच्या वाट्याचे पाणी चोरणारे महाविकास आघाडीतील नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात रोष व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातील आठ आमदार आणि दोन खासदारांनी सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. भाजप खासदार आणि आमदारांचे म्हणणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांच्या कानावर घातले. विभागीय आयुक्तांना फोन लावून भाजप नेत्यांशी संवाद घडवून आणला. विभागीय आयुक्तांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर भाजप नेत्यांनी उपोषण मागे घेतला.
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत आदी आमदार उपस्थित होते.