सोलापूरचा अटकेपार झेंडा; सोलापूरची कन्या बनली गोंदियाची जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:14 PM2021-07-14T12:14:38+5:302021-07-14T12:14:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : सोलापुरातील मेजर खांडेकर यांची कन्या व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या पत्नी नयना गुंडे यांनी मंगळवारी गोंदियाच्याजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी नयना गुंडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गावचे सुपुत्र डॉ. अर्जुन गुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. १९९२ मध्ये गुंडे यांनी प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. सुरूवातीला कुर्डुवाडी व सोलापूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर नाशिक विभागात म्हाडाच्या मुख्याधिकारी, मुद्रांक नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी कामकाज केले.
२०१४ मध्ये त्यांना आयएएस म्हणून पदोन्नती झाल्यावर नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे परिवहन महामंडळात अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. तसेच यशदा प्रबोधिनीत उपमहासंचालक म्हणून त्यांनी काम केले. नुकतीच त्यांची गोंदिया जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. पदभार घेतल्यावर त्यांनी आपल्या माहेरचा अभिमान व्यक्त केला.