ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट १५ सप्टेंबर पूर्वीच करा : राजेंद्र भोसले
By admin | Published: May 2, 2017 05:00 PM2017-05-02T17:00:17+5:302017-05-02T17:00:17+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. ०२ :- ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट येत्या १५ सप्टेंबर २०१७ पूर्वीच पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्याने ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण केले. यावर्षी ही हे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे.पण हे काम १५ सप्टेंबर २०१७ पूर्वीच पूर्ण व्हायला हवे. ध्वज दिन निधी संकलनासाठी देण्यात आलेल्या जुन्या पावत्या आणि ध्वज सैनिक कल्याण कार्यालयाकडे जमा करण्यात याव्यात. पावत्या हरवल्या असतील तर तसे पैसे भरुन टाकावेत.
माहिती अधिकार कायद्याखालील प्रलंबित अर्ज निकालात काढण्यासाठी मोहिम राबवावी. माहिती अधिकार कायद्याखालील कलम चारच्या नियमानुसार आपआपल्या विभागाची माहिती वेबसाईटवर अद्यावत करण्यात यावी. ज्या विभागाकडे माहितीचा अधिकाराखाली जास्त अर्ज प्रलंबित आहेत. त्यांचा स्वतंत्र आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
पुढील महिन्यापासून सेवा हमी कायद्याखाली दिल्या जाणा-या सेवाचांही आढावा घेतला जावा. असे भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध अर्ज येतात हे अर्ज संबंधित विभागाकडे पाठवले जातात पण त्या अजार्ला काय उत्तर दिले याची माहिती मिळत नाही. अशा प्रकरणात दिलेल्या उत्तरांची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात यावी, असे भोसले यांनी सर्व अधिका-यांना सांगितले.
गेल्या वर्षी जिल्ह्यात किती झाडे लावली त्यापैकी किती जगली याचा आढावा घ्यावा आणि अहवाल सादर करा. यंदाच्या मोहिमेचेही नियोजन करावे, अशा सूचना भोसले यांनी वन विभागाच्या अधिका-यांना दिल्या. दरम्यान आज झालेल्या लोकशाही दिनात चार नवे अर्ज दाखल झाले या चार आणि प्रलंबित तीन अर्जावर संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाही करावी असे भोसले यांनी सांगितले. बेठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
----------------
बुके ऐवजी बुक द्या ""
दरम्यान श्री. भोसले यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक व्यक्तीनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बुके ऐवजी बुक दिल्यास मला आवडेल, असे राजेंद्र भोसले यांनी सांगितले.