स्लीप भरण्याचा बहाणा; २३ हजार केले लंपास
By admin | Published: July 18, 2014 01:31 AM2014-07-18T01:31:35+5:302014-07-18T01:31:35+5:30
महावीर चौक : महाराष्ट्र बँकेतील घटना
सोलापूर : बँकेत स्लीप भरून दाखविण्याचा बहाणा करीत एका युवतीजवळील २३ हजारांची रोकड पळविल्याची घटना १६ जुलै रोजी दुपारी १२़१५ वाजता महावीर चौकात महाराष्ट्र बँकेत घडली़ याबाबत स्रेहांकिता रवींद्र चव्हाण (वय २३, रा़ यशवंत नगर, सिव्हिल लाईन) यांनी अनोळखी दोन इसमांविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे़
फिर्यादी स्रेहाकिंता या आईला सोबत घेऊन बँकेत आल्या होत्या़ यावेळी त्यांनी बँकेत भरण्यासाठी ७३ हजार रुपये सोबत आणले होते़ स्रेहाकिंता पैसे भरण्यासाठी रांगेत थांबल्या असताना या ठिकाणी थांबलेल्या दोघांनी ‘तुमची स्लीप चुकली आहे, त्यावर नोटांचे नंबर टाकावे लागतात’ असे सांगत हातातून पैसे आणि स्लीप दुरुस्तीसाठी घेतली़ नंबर टाकण्याचा बहाणा करीत त्यांनी स्लीप आणि पैसे परत दिले़ कॅशिअरने मशीमध्ये बंडल टाकून नोटा मोजल्या असता ७३ हजारांपैकी केवळ ५० हजार रुपयेच असल्याचे निदर्शनास आले़ २३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मायलेकींनी सदर बझार पोलीस ठाणे गाठले़ तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे करीत आहेत़