बोरी नदीला पूर; मैंदर्गी, दुधनी, गाणगापूरचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:16+5:302021-09-25T04:22:16+5:30
बुधवार व गुरुवार असा सलग दोन दिवस परतीचा पाऊस अक्कलकोटसह नजीकच्या तुळजापूर या दोन तालुक्यांत सर्वत्र धुमाकूळ घालत ...
बुधवार व गुरुवार असा सलग दोन दिवस परतीचा पाऊस अक्कलकोटसह नजीकच्या तुळजापूर या दोन तालुक्यांत सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. यामुळे कुरनूर धरणातून गुरुवारी मध्यरात्रीपासून तब्बल १ हजार ८०० क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे सांगवी, ममदाबाद, निमगाव, मिरजगी, सातन दुधनी, रुद्देवाडी, बबलाद आदी ठिकाणचे बंधारे भरून वाहत आहेत. नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे बोरी, हरणा नदीपात्रांजवळील हजारो हेक्टर ऊसपीक पाण्याखाली गेले आहे. तसेच तूर, उडीद, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. रात्रंदिवस उभ्या पिकात पाणी साचून असल्याने तत्काळ पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
डोंबरजवळगे येथील ओढा दुथडी भरून वाहत आहे. यामुळे शेकडो हेक्टर उभे पीक पाण्याखाली गेले आहे. पाच तास गावचा संपर्क तुटला होता. अरळी ओढा रात्रीपासूनच भरून वाहत आहे. सर्व पिके बारा तासांहून अधिक काळ पाण्याखाली होती. सलगर येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही तास संपर्क तुटला. तसेच तलावही १०० टक्के भरून सांडवा वाहू लागला आहे. घोळसगाव तलाव १०० टक्के भरून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी साचले आहे. अनेकांची उभी पिके वाहूनही गेली. रस्ते वाहून गेल्यामुळे येणे-जाणेही कठीण झाले आहे. मुगळी, बिंजगेर, नागुरे, जेऊर, वागदरी, शिरवळ, नागणसूर, तोळनूर, चपळगाव, हन्नूर, नन्हेगाव, कर्जाळ, काळेगाव, शिरसी, सांगवी आदी गावांचे ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्याने पिके हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
----
दिवसभर या गावांचा संपर्क तुटला..
बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैदर्गी, दुधनी, गाणगापूर या मार्गांवरील संपर्क काही तास तुटला. निमगाव पुलावर पाणी आल्याने सलगर, चिक्केहळळी, कर्नाटक येथे जाणारा मार्ग बंद झाला होता. आंदेवाडी (ज.) या गावाला जोडणा-या दुधनी-आंदेवाडी, बोरोटी-आंदेवाडी या दोन्ही मार्गांवरील पुलांवर चार फूट पाणी आले होते. यामुळे दिवसभर गावाचा संपर्क तुटला होता.
--- दोन दिवसांत मंडळनिहाय पाऊस
अक्कलकोट - ४५ मि.मी., चप्पळगाव- ४२, किणी- ३७, मैदर्गी- २७, दुधनी- ३१, जेऊर- ३७, करजगी- ३३, तडवळ- १९ असा सरासरी तब्बल ३५ मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाल्याचे सांगण्यात आले.
----
फोटो आहेत.