उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरीत पूर; व्यास नारायण झोपडपट्टीत शिरले पाणी
By Appasaheb.patil | Published: August 27, 2024 04:56 PM2024-08-27T16:56:33+5:302024-08-27T16:57:09+5:30
चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे.
उजनीतून भीमेत ८० हजार क्यूसेकचा विसर्ग तर वीरमधून नीरा नदीत ६३ हजाराचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०७.७ टक्के एवढा आहे. सीना माढा, दहिगांव, मुख्य कॅनॉल, वीजनिर्मिती, नदीत पाणी सोडण्यात येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून दौंडमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे पंढरपुरातील भीमा नदीला पूर आला असून पुरामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.
सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाकडून याेग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बाधित परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.