गावागावातील गावकऱ्यांना पिठाची चक्की, बचतगटासाठी उभारणार मॉल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 04:06 PM2022-01-20T16:06:25+5:302022-01-20T16:06:30+5:30
ग्रामपंचायतीचा आराखडा : आरोग्य केंद्र चकाचक, सांडपाणी घरातच जिरविणार
सोलापूर : जिल्ह्यातील दोन हजार शाळा स्वच्छ आणि सुंदर केल्यानंतर, आता जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आराखड्यात घरपट्टी वेळेवर भरणाऱ्या गावकऱ्यांसाठी मोफत पिठाची चक्की, बचत गटातील वस्तूंसाठी तालुकास्तरावर मॉल, गावातील सांडपाणी घरातच जिरवणे व आरोग्य केंद्र चकाचक करण्यावर भर दिला आहे. १ हजार १९ ग्रामपंचायतींपैकी ७४५ ग्रामपंचायतींनी विकास आराखडे जिल्हा परिषदेला ऑनलाइन सादर केले आहेत.
शासनाने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विकास आराखडे ३० जानेवारीपर्यंत ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी परिपत्रकाद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना कळविले आहे. यात पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या अनुदानाचा तपशील कळविण्यात आला आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीने विकास आराखडे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर, जिल्हा परिषदेचा विकास आराखडा तयार होणार आहे. आता आरोग्य केंद्र स्वच्छ व सुंदर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आराखडे परिपूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
३० जानेवारीची डेडलाइन
- सीईओ स्वामी यांनी ग्रामपंचायतींना आराखडे अपलोड करण्याची ७ जानेवारीची डेडलाइन दिली होती. त्यानंतरही काम कमी झाल्यावर, पुन्हा १२ जानेवारी रोजी परिपत्रक काढून इशारा दिला. त्यावर ७४५ ग्रामपंचायतींनी आराखडे अपलोड केले.
- आराखडे तयार करण्यासाठी १ हजार ११ ग्रामपंचायतींनी संस्था नियुक्त केली. यातील १ हजार ४ जणांनी आराखडा तयार केला. ९०७ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेण्याचे निश्चित केले. ८६९ ग्रामपंचायतींनी सभा घेऊन आराखडे अपलोड केले, पण त्यातील १६९ आराखडे फेल झाले.
अडचणी काय/
- ०सर्वच ग्रामपंचायतींनी आराखडे तयार केले आहेत. आराखड्यात पाणी आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकी ३० टक्के व इतर सुविधांसाठी ४० टक्के निधी राखीव ठेवायचा असतो. यात आरोग्य, महिला, बालकल्याणला महत्त्व दिले आहे.
- ०या आराखड्याला तालुकास्तरीय तांत्रिक समितीची मान्यता लागते. ही समिती ठरल्याप्रमाणे निधीचे प्रस्ताव तयार झालेत की नाही, याची तपासणी करते. चूक असेल, तर दुरुस्तीसाठी प्रस्ताव परत पाठविते, यामुळे विलंब होत आहे.
माढा पंचायत समितीने बचतगटाच्या उत्पादनासाठी मॉल उभारण्यासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. ‘माझी वसुंधरा’चे काम सुरू आहे. ग्रामपंचायतीचे आराखडे मंजूर झाले आहेत. पोर्टलवर आराखडे अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
संताजी पाटील, गटविकास अधिकारी, माढा.
मोहोळ पंचायत समितीने स्वच्छता व सांडपाण्यावर भर दिला आहे. ग्रामपंचायतीने पर्यावरणासाठी झाडे लावणे, आरोग्य केंद्र सुशोभीकरण असे प्रस्ताव तयार करून आराखडे मान्यतेसाठी पाठविले आहेत. शंभर टक्के काम लवकरच होईल.
- गणेश मोरे, गटविकास अधिकारी, मोहोळ.
शासनाच्या सूचनेनुसार सर्व ग्रामपंचायत व पंचायत समितींना वेळेत आराखडे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आराखड्यात अभिनव कार्यक्रम हाती घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगवेगळे चांगले प्रस्ताव तयार केले आहेत.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी.