माळीनगर येथे उड्डाणपूल तर महाळुंग येथे बाह्यवळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:06+5:302021-03-28T04:21:06+5:30
संत तुकोबांच्या पालखी महामार्गावरील महाळुंग बोरगाव आणि माळखांबी येथील विवादित मुद्द्यांच्या न्यायनिवाड्यासाठी प्रांताधिकारी शमा पवार यांनी महाळुंग येथे आज ...
संत तुकोबांच्या पालखी महामार्गावरील महाळुंग बोरगाव आणि माळखांबी येथील विवादित मुद्द्यांच्या न्यायनिवाड्यासाठी प्रांताधिकारी शमा पवार यांनी महाळुंग येथे आज (गुरुवार दि. २५ ) बैठक घेतली. या बैठकीत पालखी मार्गावरील बाधित नागरिकांच्या शंकांचे निरसन करून त्यावर तोडग्याचे योग्य ते निर्देश देण्यात आले.
या बैठकीला मंडल अधिकारी चंद्रकांत भोसले, तलाठी सिद्धेश्वर भोसले, संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शमा पवार म्हणाल्या की, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी अकलूज विभागाला १८७ कोटींचा निधी दोन टप्प्यांमध्ये उपलब्ध झाला आहे. नागरिकांना मोबदला देण्याचे काम बऱ्यापैकी उरकत आले आहे. राहिलेल्यांना मोबदला देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महाळुंग येथे पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या यमाई देवीच्या मंदिरामागून हा महामार्ग गेला आहे. मंदिरापासून १०० मीटरच्या आत कसलेही बांधकाम करायचे नाही असा नियम होता. यासंदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका होऊन तोडगा निघाला असल्याचे प्रांत अधिकारी शमा पवार यांनी सांगितले. माळीनगर येथील नागरिकांच्या सोयीप्रमाणे येथील बंदिस्त उड्डाणपूल आत दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
-----
आज मोजणी
महाळूंगच्या मंदिराजवळील बायपाससाठी शनिवारी मोजणी होणार आहे. तोपर्यंत येथील २३ गटांमधील मोबदला प्रलंबित ठेवला आहे. या मोजणीचा नकाशा आपल्यापर्यंत आल्यानंतर पुढील पंधरा दिवसात येथील मोबदला देण्याचे काम मार्गी लागेल असे प्रांत अधिकारी शमा पवार यांनी सांगितले. सध्या भूसंपादनामध्ये ज्या गटांचा समावेश आहे त्यातील काही गट वगळले जाण्याची व काही नव्याने समाविष्ट होण्याची शक्यता त्यांनी सांगितली.
-----
शंकांचे निरसन करुन घ्या
भूसंपादन व इतर मालमत्तांच्या मोबदल्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. मोबदला मिळवून देण्यासंदर्भात नागरिकांची दिशाभूल होत असलेल्या तक्रारी आहेत. मोबदल्यासाठी नागरिकांनी थेट महसूल प्रशासनाची संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन प्रांत अधिकारी शमा पवार यांनी केले. शासकीय निकषांनुसार सर्वांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये थोडे पुढे मागे झाल्यास गोंधळून जाऊ नये. कोणीही वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी दिला.
------