सोलापुरात उड्डाणपुल होणार; मुळ जागा किंमतीसह एक वर्षाचे व्याजही मिळणार
By Appasaheb.patil | Published: January 1, 2023 03:35 PM2023-01-01T15:35:27+5:302023-01-01T15:35:48+5:30
आठ कोटींची भरपाईचे लवकरच होणार वितरण : साहित्य हलविण्यासाठी पैसेही देणार
सोलापूर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला दिवसेंदिवस वेग येऊ लागला आहे. जुना पुणे नाका ते पत्रकार भवनपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलासाठीची प्रक्रिया वेगात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी मिळकतदारांना नाेटिसा देण्याचे काम सुरू असून, ३२ जणांना ८ कोटी ७ लाख ४३ हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. मूळ जागेची किंमत, एक वर्षाचे व्याज अन् साहित्य हलविण्यासाठी पुरेसे पैसेही देण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांनी दिली.
शहरात जुना पुना नाका ते पत्रकार भवन चाैक (सेक्शन १) आणि जुना बाेरामणी नाका ते माेररका बंगला (सेक्शन २) या दरम्यान दाेन उड्डाणपूल हाेणार आहेत. जिल्हा प्रशासनाने सेक्शन १ मध्ये बाधित हाेणाऱ्या खासगी व सरकारी जागा, इमारतींची अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात जाहीर केली हाेती. प्रशासनाला एक वर्षाच्या आत निवाडे करून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करायची हाेती. ती आता करण्यात आली असून, मिळकतदारांना नोटिसा देण्याचे काम वेगात सुरू आहे. जानेवारी महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले. सोलापूर शहरात जुना पुणे नाका ते पत्रकार भवनपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलासाठी चार टप्प्यांत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.-
भूसंपादन झाल्यावरच कामाची निविदा...
भूसंपादनाला वेळ लागत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर, प्रशासनाने या उड्डाणपुलाच्या कामासाठी गती घेतली. मात्र, जाेपर्यंत भूसंपादन पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाची निविदा काढणार नाही, असे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.--मिळकती ३२ अन् मालक दीडशे...जुना पुणे नाका ते एसटी स्टॅण्डपर्यंतच्या भूसंपादनात ३२ मिळकती आहेत. मात्र, एका मिळकतीवर एकापेक्षा जास्त नावे असल्याने, मालकांची संख्या दीडशेच्या वर आहे. भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही, कायेदशीर प्रक्रिया करूनही संबंधितांना पैसे दिले जाणार आहेत, अशीही माहिती देण्यात आली.