हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांची लाईफलाईन...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:26 AM2019-02-27T10:26:52+5:302019-02-27T10:28:43+5:30
‘कुठं चालला बे?’ ‘पुण्याला बे! ‘सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सोलापुरातून निघणाºया हुतात्मा एक्स्प्रेसमधला हा नेहमीचा डायलॉग आणि मग ...
‘कुठं चालला बे?’ ‘पुण्याला बे! ‘सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सोलापुरातून निघणाºया हुतात्मा एक्स्प्रेसमधला हा नेहमीचा डायलॉग आणि मग ‘ तू कुटं बे?’ हा पुढचा प्रश्न. ‘मी बी पुन्यालाच की, आनि कुटं?’ आता खरेतर पुण्याला जाणाºया ट्रेनमध्ये बसल्यानंतर ही चर्चा तशी निरर्थकच, पण सोलापूरकरांना ते कोण सांगणार? सोलापुरातून पुण्याला जाणाºया आणि सायंकाळी परत येणाºया प्रवाशांची लाईफलाईन असलेली ही हुतात्मा एक्स्प्रेस येत्या १५ जुलै २०१९ रोजी एकोणिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
१८ वर्षे तक्रार न करता, न कुरकुरता, अपघातात न सापडता या गाडीने सोलापूरकरांना सेवा दिलेली आहे. सुशील गायकवाडांनी चालू केलेल्या प्रथेप्रमाणे इंजिनची पूजा करून, गार्ड व चालकाचा सन्मान करून, केक कापून दर वाढदिवसादिवशी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात येतो, अशीच कधीही अपघातग्रस्त न होता अविरत सेवा या ट्रेनकडून घडावी, अशा शुभेच्छा देऊन. मागील जुलैमध्ये योगायोगाने मी या क्षणाचा साक्षीदार झालो. तसा मीही या ट्रेनने अनेकदा प्रवास केलेला आहे. बºयाचदा एसी चेअर कारने तर काही वेळा २ टायर सिटिंगने. गमतीशीर असा हा प्रवास असतो. त्यातलेच काही मजेचे क्षण आपल्याशी शेअर करावेसे वाटले. आपला अनुभव याहून वेगळा असेल, असे मला वाटत नाही.
पुण्यात शिकणाºया मुला-मुलींसाठी आणि त्यांना भेटण्यासाठी सोलापूर-पुणे चकरा मारणाºया मध्यमवर्गीय आई-बापांसाठी ही ट्रेन म्हणजे वरदान आहे. सकाळी गडबडीत दुचाकीवर स्टेशनला पोहोचून, मुलीला डब्यात बसवून कृतकृत्य होणारे अनेक बाप मी पाहिले आहेत. ट्रेन निघताना हळूच चोरून डोळ्यांत आलेले अश्रू टिपतानाची आई आणि बाप इथेच पाहायला मिळतात. काही महिन्यांनंतर सरावलेले हेच बाप गेटवर मुलीला सोडून बाय करतानाही इथेच आढळतात. पण रात्री १०.३० वाजता येणाºया या ट्रेनने येणाºया लेकीची आतुरतेने वाट पाहताना मात्र हेच बाप ट्रॅफिक जाम करतात.
एक छोटीशी ट्रॉली बॅग आणि पाठीवर हॅवरसॅक घेऊन झपाझप चालणाºया अशा बºयाच मुलीही स्टेशनवर पाहायला मिळतात याच वेळी. खुरटी दाढी, जीन पँट आणि टी-शर्ट या पेहरावात कानाला हेडफोन लावून जगाशी आपला काय संबंध अशा आविर्भावात वावरणारी तरुण मुले आजूबाजूला असतातच मोठ्या संख्येने.
एकाच सीटवर दोन रिझर्व्हेशन्स आली म्हणून भांडणारी आणि नंतर माझं नंबर डी ८ मध्ये आहे म्हणून सॉरी न म्हणता रुबाबात निघून जाणारी मंडळीही याच ट्रेनमध्ये सापडतात. तुमच्या रिझर्व्हेशन्स असलेल्या सीटवर आरामात पथारी पसरून तुम्हालाच थोडं अॅडजेस्ट करा म्हणणारे महाभागही इथेच दिसतात.
ट्रेन सुटल्या सुटल्या ‘सूर नवा, ध्यास नवा’ स्टाईलने पुणे येईपर्यंत घोरणारी मंडळीही पाहायला मिळतात. तेरे मोबाईल में मेरे से अच्छा गाना कैसे? असा विचार करून दोन पॅसेंजरमध्ये होणारी गाणी मोठ्याने वाजविण्याची जुगलबंदी इतर सर्वांना गुपचूप ऐकायला लागते, याच ट्रेनमध्ये. अगदी एसी चेअर कारसुद्धा याला अपवाद नाही. फार वर्षांनी भेटल्याच्या आवेशात मोठमोठ्यानं गप्पा मारणारी मंडळी, जणू आता पुन्हा या आयुष्यात भेट होते की नाही, अशा आविर्भावात चार तास गप्पा मारून शेजाºयांना पीड पीड पिडतात आणि सोलापूर स्टेशन आल्यानंतर एकाच दुचाकीवरून घरी जातात. अप-डाऊन करून आॅफिसची कामे करणारी, बिझनेस करणारी सरावलेली मंडळी मात्र निर्धास्तपणे अगदी एक मिनिट आधी येऊन ट्रेन पकडतात. पटकन स्थानापन्न होतात, मस्त झोप काढतात आणि ट्रेन थांबताच बॅग उचलून उतरूनही जातात.
सोलापूर हे मेडिकल हब असूनही उपचारासाठी पुण्याला जाण्यात सोलापूरकरांना मोठेपणा वाटतो. तो मिरवायलाही त्यांना आवडतो. मग या ट्रेनमधे बसून अमुक एका डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळणे किती अवघड आहे, ती मी कशी खुबीने मिळविली याचे रसभरीत वर्णन केले जाते. एखादा डॉक्टर कसा खडूस आहे किंवा एखादा कसा लुटतो, असे चारचौघांना साक्षीला ठेवून डॉक्टरचे वस्त्रहरणही केले जाते. पुढच्या सीटवरून मागे लांब बसलेल्या मारवाडी स्नेह्याला हाक मारून ‘ नींद हुअी गयो की नही’ असे बिनदिक्कत विचारले जाते. मोठमोठ्या चकचकीत बॅग्ज आणि त्याला लटकणारे टॅग्ज दिसले की, ओळखायचे मंडळी परदेशी निघाली आहेत.
अचानक भेटणारी मित्रमंडळी हा प्रवास एंजॉय करतात. मनसोक्तगप्पा मारतात. आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी पुरेशी शिदोरी घेऊन ट्रेनमधून उतरतात. सोलापुरात क्वचित भेटणारी मंडळीही या ट्रेनमधे शेजारी बसून काही तास गप्पात गुंग होतात. नव्या बिझिनेस आयडिया शोधतात. त्यावर कामाला लागतात. एकूणच सोलापूरकरांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे ही हुतात्मा एक्स्प्रेस. या हुतात्मा एक्स्प्रेसच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत)