अवघ्या जिल्ह्याचे लक्ष, कोण साधणार विजयाचा ‘सुवर्ण मध्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:53 AM2019-10-23T10:53:19+5:302019-10-23T10:56:13+5:30
सोलापूर शहर मध्य; एमआयएम, महेश कोठे यांना अनपेक्षित साथ
राकेश कदम
सोलापूर : शहराशी संलग्न तीनपैकी दोन मतदारसंघाच्या निकालाचा सर्वांनाच अंदाज आला आहे. आता शहर मध्य मतदारसंघातील काही भागातून वेगवेगळे कौल येत आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना आघाडीवर आहे, परंतु एमआयएम आणि महेश कोठे यांना अखेरच्या टप्प्यात चांगली साथ मिळाल्याने चर्चेत रंगत वाढली आहे. या वातावरण विजयाचा सुवर्णमध्ये कोण साधणार याकडे लक्ष आहे.
शहर मध्य मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे दिलीप माने, माकपचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारुक शाब्दी, अपक्ष उमेदवार महेश कोठे यांच्यात खरी लढत झाली. एकूण तीन लाख दोन ११६ मतदारांपैकी एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या निवडणुकीत ५८.९८ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.४७ टक्के मतदान झाले. रामवाडीपासून अशोक चौकापर्यंतच्या मतदान केंद्रावर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसली.
अशोक चौकापासून पूर्व भागात काँग्रेस, महेश कोठे, शिवसेना आणि माकप यांच्यात चुरस दिसली. शास्त्रीनगर, बापूजी नगर, विजापूर वेस या पट्ट्यात काँग्रेस आणि एमआयएमचा जोर होता. मतदारांचा कल लक्षात आल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे; मात्र या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचा ‘सायलेंट व्होटर’ आहे. तो उघडपणे चर्चा करण्याऐवजी शांतपणे महायुतीलाच साथ देतो. त्यामुळे दिलीप माने समर्थक विजयाच्या दाव्यावर ठाम आहेत.
असा झाला प्रचार
- शिवसेना, एमआयएम आणि महेश कोठे यांच्या टीकेचा संपूर्ण रोख प्रणिती शिंदे आणि काँग्रेसवर अपेक्षित होता. परंतु, या तिघांनाही इतर उमेदवारांवर टीकेचे बाण सोडावे लागले. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याच गोंधळावर बोट ठेवलेले दिसले. प्रणिती शिंदे यांनी प्रत्येक भाषणात ‘मी तुमची मुलगी आहे, मी तुमची बहीण आहे’, अशी भावनिक साद घातली. हे बाहेरचे लोक तुम्हाला काय देणार असा प्रश्न उपस्थित केला.
दिलीप माने यांनी काँग्रेस नेतृत्वाला निष्क्रिय ठरविताना रोजगार, उद्योग या मुद्यांना स्पर्श केला. त्यांच्या समर्थकांनी ‘हिंदुत्व’ हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शाब्दी सुरुवातीला ठराविक वस्त्यांमध्ये रमले. यंत्रणा काहीशी विस्कळीत होती. कार्यकर्त्यांना तौफिक शेख यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. रोजगार, शिक्षण, सर्वांना स्वस्तात घरे, आरोग्य, सामाजिक सुरक्षा हे माकपच्या प्रचारातील मुद्दे होते.